मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – रॉबरीसह घरफोडीच्या उदेशाले आलेल्या पाचजणांच्या एका टोळीला जेरबंद करण्यात बोरिवली, चारकोप आणि पार्कसाईट पोलिसांना यश आले आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी घरफोडीच्या साहित्यासह दोन बाईक जप्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन सहकारी पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या आदेशानंतर शनिवारी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील, पोलीस हवालदार बहिरम, शेख, फर्डे आदी पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री एक वाजता एक वाजता बोरिवलीतील कुलकर्णी रोड, सुयोग इमारतीजवळ तीनजण संशयास्पद फिरत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच या पथकाने तीनपैकी मिलिंद मनोहर सावंत आणि अरविंद राजन गडकरी या दोघांना इमारतीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना शिताफीने ताब्यात घेतले तर त्यांचा तिसरा सहकारी यश दिपक कोठारी पळून गेला. चौकशीदरम्यान तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. मिलिंदविरुद्ध एमआयडीसी, वांद्रे, ताडदेव, बोरिवली, मुलुंड, शिवाजी पार्क, पार्कसाईट, गुन्हे शाखा, पवई, मालाड, पुण्याच्या चितळसर, कासार वडवली पोलीस ठाण्यात रॉबरी, मारामारीसह दंगल घडविणे, घरफोडी, बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक करणे अशा वीस तर अरविंदविरुद्ध चारकोप, मुंगा, ताडदेव पोलीस ठाण्यात विनयभंगासह रॉबरी आणि बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याचे तीन गुन्हे दाखल आहे. पळून गेलेल्या यशविरुद्ध अशाच प्रकारच्या चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी घरफोडीच्या साहित्यासह केटीएम आणि ऍक्टिव्हा बाईक जप्त केल्या आहेत.
दुसर्या कारवाईत विघ्नेश वासुदेव मोरे ऊर्फ साई आणि पियुष शंभुराज पांडे या दोघांना चारकोप पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी ते दोघेही कांदिवलीतील चारकोप, सह्याद्रीनगर परिसरात घरफोडीच्या उद्देशाने आले होते. ही माहिती प्राप्त होताच एपीआय भोये, पोलीस हवालदार पाटेकर, वाघमारे व अन्य पोलीस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी त्यांचा तिसरा सहकारी पळून गेला. या दोघांकडून पोलिसांनी घरफोडीचे साहित्य जप्त केले आहेत.
अन्य एका घटनेत पार्कसाईट पोलिसांनी मोहम्मद इमान शान मोहम्मद शेख याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईलसह एक कटावणी जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध पवई, विक्रोळी आणि पार्कसाईट पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह गंभीर दुखापतीसह रॉबरी केल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. शनिवारी १७ फेब्रुवारी रात्री साडेदहा वाजता विक्रोळीतील टी जंक्शनजवळ पार्कसाईट पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्याचा एक सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.