धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलांचे दागिने चोरी करणार्या आरोपीस अटक
रेल्वे पोलीस बनले ट्रकमन; चार गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलांचे दागिने चोरी करुन पळून गेलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस रेल्वेच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सैफ अजगरअली चौधरी असे या आरोपीचे नाव तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी काळुंद्री नदी येथे ट्रकमन बनवून फिल्डिंग लावली होती, सैफच्या अटकेने रॉबरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून पोलिसांनी चारही गुन्ह्यांतील सुमारे पाच लाख रुपयांचे १३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर यांनी सांगितले.
चंद्रावती सदाशिव शेट्टी ही ६८ वर्षांची वयोवृद्ध महिला अंधेरीतील चकाला परिसरात राहते. २९ फेब्रुवारीला ती उडपी रेल्वे स्थानकातून मत्स्यगंधा एक्सप्रेसने लोकमान्य टिळक टर्मिनसला येत होती. ही एक्सप्रेस १ मार्चला सकाळी पावणेसात वाजता घाटकोपर रेल्वे स्थानक येण्यापूर्वी धीम्या गतीने जात होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने चंद्रावती यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चैन चोरी करुन चालत्या गाडीतून पलायन केले होते. ही एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात येताच तिने घडलेला प्रकार कुर्ला रेल्वे पोलिसांना सांगितला होता. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. अशाच प्रकारे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हे घडले होते. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन शेडगे, रविंद्र दरेकर, संदीप गायकवाड, पोलीस हवालदार सतीश थायगुडे, अनिल खाडे, शशिकांत कुंभार, पोलीस नाईक अमीत बडेकर, राजेश कोळसे, गणेश माने, इम्रान शेख, पोलीस शिपाई हरिश संदानशिव आणि सुनिल मागाडे यांनी तपासाला सुरुवात केली होती. पनवेल, घाटकोपर, ठाणे रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यातील एका फुटेजमध्ये पोलिसांना सैफ दिसला होता. त्यावरुन तपासाची चक्रे फिरली. सैफ हा काळुंद्री नदी येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर रेल्वे पोलिसांनी तिथे ट्रकमन बनून साध्या वेशात पाळत ठेवली होती. सैफ तिथे गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला असता त्याला या पथकाने शिताफीने अटक केली.
सैफ हा मूळचा उत्तरप्रदेशच्या गाझियाबादचा रहिवाशी आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे रॉबरीच्या गुन्ह्यांतील काही आंतरराज्या टोळीतील सदस्यांशी संबंध आहे. तो चोरीसाठी उत्तरप्रदेशातून मुंबईत येत होता. चोरी केल्यानंतर तो पुन्हा उत्तरप्रदेशात पळून जात होता. तिथे चोरीचे दागिने विकून तो पाच ते सहा महिन्याने पुन्हा मुंबईत येत होता. त्याच्या अटकेने पनवेल आणि कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन असे चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील १३७ ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.