मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – दरोड्यासाठी आलेल्या चारजणांच्या एका टोळीला दरोड्यापूर्वीच वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिताफीने अटक केली. विनोद किशोर वैष्णव, पिंटू कमलेश चौधरी, अशफाक अब्दुल सय्यद आणि चॉंद इब्राहिम शेख अशी या चौघांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, चाकू, कटावणी, जोड काळे हातमोजे, मास्क, तीन मोबाईल, दोन बाईक, अमीत ज्वेलर्सचे व्हिझिंटिंग कार्ड, असा सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांसह मोक्का कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले.
अंधेरीतील सातबंगला, ऍक्सिस बॅकेजवळ एक ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात काहीजण घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोड्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत जाधव, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस हवालदार पवार, तुषार भोसले, ईनामदार, साबळे, पठाण, घाडगे, खैरनार यांनी सातबंगला परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तिथे दोन बाईकवरुन पाच तरुण आले होते. या तरुणांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यापैकी चौघांना ताब्यात घेतले तर त्यांचा एक सहकारी पळून गेला. या चौघांच्या अंगझडतीत पोलिसांना देशी बनावटीचे पिसतूल, तीन राऊंडसह दरोड्यातील इतर साहित्य सापडले. पोलीस ठाण्यात आणल्यांनतर या चौघांची नावे विनोद वैष्णव, पिंटू चौधरी, अशफाक सय्यद आणि चॉंद शेख असल्याचे उघडकीस आले. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
यातील अशफाक हा पूर्वी रवी पुजारी टोळीशी संबंधित होता. त्याने निर्माता करीम मोरानी यांच्यावर गोळीबार केला होता. तसेच त्याच्यविरुद्ध येलोगेट पोलीस ठाण्यात अन्य एका गोळीबाराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. विनोद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. पिंटूविरुद्ध मारामारीसह दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. विनोद हा मजुरीचे काम करत असून तो मूळचा नागपूरच्या कामठीचा रहिवाशी आहे. सध्या तो वडाळा येथे राहतो. पिंटू वरळी, अशफाक मानखुर्द तर चॉंद हा शिवडीचा रहिवाशी आहे. या कारवाईदरम्यान शंकर चौरसिया हा आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तपासादरम्यान त्यांनी एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याची योजना बनविल्याची कबुली दिली आहे. मात्र दरोड्यापूर्वीच या चौघांना पोलिसांनी घातक शस्त्रांसह अटक केली. अटकेनंतर या चारही आरोपींना गुरुवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.