रॉबरीच्या गुन्ह्यांतील आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह अटक
आरोपीच्या अटकेने रॉबरीच्या इतर गुन्ह्यांची उकल होणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्या एका वयोवृद्ध महिलेच्या हातातील पर्स चोरी करुन पळून गेलेल्या आरोपीला काही तासांत डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. आरिफ झाकीर शेख असे या 20 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरिफने मरिनलाईन्स परिसरात अशाच प्रकारचे काही गुन्हे केले असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पूरबी भार्गव वैद्य ही 61 वर्षांची वयोवृद्ध महिला भुलेश्वर येथे राहते. शुक्रवारी 14 मार्चला सकाळी साडेसहा वाजता ती मामा परमानंद मार्ग येथून चर्नीरोडच्या दिशेने जात होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिची पर्स चोरी करुन पलायन केले होते. या पर्समध्ये पंधरा हजाराची कॅश, विविध बँकेचे चार डेबीट, एक क्रेडिट कार्ड आणि आधारकार्ड आदी मुद्देमाल होता. या घटनेनंतर तिने डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी रॉबरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने काही तासांत पळून गेलेल्या आरिफ शेख या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यानेच ही रॉबरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने मरिनलाईन्स परिसरात अशाच प्रकारचे इतर गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्या अटकेने रॉबरीच्या इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मोहीतकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, प्रशांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गौरव तंवर, विवेक वणवे, पोलीस हवालदार संदीप तळेकर, पोलीस शिपाई मयुर पालवणकर, शेखर अभंग, संदीप बेंडकुळे, शेळके, संजय तळेकर, विकास गिते, सिद्धनाथ गलांडे, अतुल बुगड, शरद सुरवसे, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार समीर परुळेकर, योगेश राऊत, पोलीस शिपाई दत्तात्रय सातपुते आणि अनिल साळुंखे यांनी केली.