मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन दोन अज्ञात व्यक्तींनी एका खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनीची दोन कोटीची कॅश पळवून नेल्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी तोतयागिरी करुन लुटमार केलयाप्रकरणी दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाईकवरुन पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. गौरव मसुरकर असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून तो परळचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 45 लाखांची कॅश आणि तीन मोबाईल जप्त केले आहे. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास गिरगाव येथील एसव्हीपी रोड, चौथी खेतवाडी कॉर्नरजवळील लहरी इमारतीसमोर घडली. 65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार इक्बाल मुसा मर्चंट हे वांद्रे येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. नरिमन पॉईट येथे त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय असून या कार्यालयात ते मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांचे मालक आतिफ याकुब आणि सुहेल याकुब यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. शुक्रारी सायंकाळी त्यांच्या मालकांनी त्यांना दोन कोटी रुपये दिले होते. ते त्यांना गिरगाव येथील पांचारपोळ येथील एका व्यापार्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे इक्बाल मर्चंट हे त्यांच्या कंपनीचे कर्मचारी शहबाज खान यांच्यासोबत दोन कोटी रुपयांची कॅश घेऊन गिरगाव येथे जाण्यासाठी निघाले होते.
सायंकाळी सहा वाजता ते गिरगावच्या एसव्हीपी रोडवरुन पांचरापोळच्या दिशेने जात होते. याच दरम्यान एका बुलेटवरुन दोन तरुण आले. या दोघांनी त्यांना बाजूला नेले. आपण क्राईम ब्रॅचचे अधिकारी असलयाचीी बतावणी करुन त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन शूटींग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना दमदाटी करुन बॅगेत काय आहे अशी विचारणा केली. या दोघांनी अंगात खाकी रंगाची पॅण्ट आणि रेड शूज घातले होते, त्यामुळे त्यांना ते खरे पोलीस असल्याचे वाटले होते. त्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात दोन कोटीची कॅश होती, त्यानंतर एकाने फोन करुन जय हिंद सर दोघांना रंगेहाथ कॅशसहीत पकड्यात आल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील बॅग घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्यासोबत येण्याचा तगादा लावला होता.
यावेळी या दोघांनी त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्याकडील मोबाईलसह दोन कोटीची कॅश असलेली बॅग घेऊन बाईकवरुन पळून गेले. या प्रकारानंतर इक्बाल मर्चंट यांनी त्यांच्या मालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांना स्थानिक पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते दोघेही व्ही. रोड पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन दोन कोटीची कॅश आणि 65 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गौरव मसुकर या परळचा रहिवाशी असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला असून त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील 45 लाखांची कॅश आणि चोरीचे तिन्ही मोबाईल जप्त केले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.