47 लाखांच्या दरोड्याच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

पिस्तूल, पाच राऊंडसह तेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 जानेवारी 2026
मुंबई, – रॉबरीच्या उद्देशाने भररस्त्यात गोळीबार करुन एका व्यापार्‍याकडील सुमारे 47 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या मोक्का गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीला अटक करण्यात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना यश आले आहे. कैलास ऊर्फ के. पी असे या आरोपीचे नाव असून तो या कटातील मुख्य आरोपी आहे. गेल्या एक वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि सुमारे तेरा लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला मोक्का कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी चार आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली होती, मात्र या चौघांच्या अटकेनंतर या कटातील म्होरक्या कैलास हा पळून गेला होता. अखेर त्याला एक वर्षांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

चिराग प्रविणकुमार धंदुकिया हा 36 वर्षांचा तक्रारदार काळबादेवी येथील रामवाडी, आदर्शवाडीजवळील गणेशभुवन इमारतीमध्ये राहतो. तो सध्या विमल एअर सर्व्हिसमध्ये कुरिअरचे काम करतो. सोमवारी रात्री साडदहा वाजता तो त्याच्या पुतण्यासोबत एका ज्वेलर्स व्यापार्‍याचे सुमारे 47 लाखांचे दागिने घेऊन स्कूटरवरुन जात होता. ही स्कूटर पी डिमेलो रोड, सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ येताच तीन ते चारजणांच्या टोळीने त्यांची स्कूटर थांबवून त्याच्या पुतण्याच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अचानक झालेल्या गोळीबारानंतर ते दोघेही प्रचंड घाबरले. काही कळण्यापूर्वीच ते दोघेही त्यांच्याकडील 47 लाख 27 हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग घेऊन पळून गेले होते. गोळीबारासह लुटमारीच्या घटनेची माहिती मिळताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे धाव घेतली होती.

याप्रकरणी चिराग धंदुकिया याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रॉबरीसह आर्म्स अ‍ॅक्टतंर्गत गुन्हा दाखल केला होता. गोळीबारासह लुटमारीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी पळून गेलेल्या चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी काही चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांच्याविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तपासात या संपूर्ण कटाचा मास्तरमाईंड कैलास ऊर्फ केपी असल्याचे उघडकीस आले होते. मात्र गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेला होता. तो वेगवेगळ्या राज्यात वास्तव्य बदलून राहत होता. त्याच्या अटकेसाठी पोलीस टिम पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आदी राज्यात गेले होते,

मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असातना कैलास हा ठाण्यात उपनगरात वावरत असून रायगड जिल्ह्यात बाजारपेठ परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडे घातक शस्त्रे असल्याने, प्रसंगी तो पोलिसांवर गोळीबार करण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे, पोलीस निरीक्षक फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज देवरे, रामप्रसाद चंदवाडे, पोलीस हवालदार चव्हाण, घाग, पवार, मोरे, सचिन पाटील कांबळे यांनी वेशांतर करुन बाजारपेठ परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

यावेळी तिथे आलेल्या कैलासला पोलिसांनी पळून जाण्याची कुठलीही संधी न देता शिताफीने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यांतील तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कैलास हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 35 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. नागपाड्याच्या एका गुन्ह्यांत तो वॉण्टेड आरोपी आहे. त्याचे सहकारी पकडले गेल्यानंतर तो इतर तरुणांना हाताशी धरुन नवीन गुन्हेगारी टोळी तयार करुन अशा प्रकारचे गुन्हे करतो. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मोक्का कायद्यांतर्गत अटक केल्यांनतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page