गिरगाव येथील पावणेतीन कोटीच्या रॉबरीचा पर्दाफाश
कंपनीच्या कर्मचार्यासह दोघांना चोरीच्या कॅशसहीत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – गिरगाव येथील पावणेतीन कोटीच्या रॉबरीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या कर्मचार्यासह त्याच्या सहकार्याला पोलिसांनी अटक केली. बैजनाथ रामलखन गुप्ता ऊर्फ पिंटू आणि इब्राहिम अब्दुल रहिम शेख अशी या दोघांची नावे असून या गुन्ह्यांत मनिष पॉल याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर दोनन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील काही कॅश हस्तगत केली असून उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नारायणहरी महावीरप्रसाद हालन हे मालाड येथे राहत असून त्यांची त्यांची हालन फायानान्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय लोअरपरेल येथील गणपतराव कदम मार्ग, मॅरेथॉन आयकॉनमध्ये आहे. त्यांचे मशिदबंदर येथे दुसरे कार्यालय आहे. याच कंपनीत बैजनाथ गुप्ता हा गेल्या दहा वर्षांपासून कामाला आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशच्या जौनपूर, दक्खिनपट्टीचा रहिवाशी आहे. अनेकदा कंपनीच्या दैनदिन व्यवहारासाठी बैजनाथ इोव्हा क्रिस्टा मॉडेल कारचा वापर करत होता. 10 सप्टेंबरला बैजनाथ हा त्याच्या दोन सहकार्यासोबत गिरगाव येथील सी. पी टँक परिसरात गेला होता.
पेमेंट घेतल्यांनतर बैजनाथ हा कार्यालयात जाणार होता. रात्री आठ वाजता त्याला विलास शिंदे याने बैजनाथला कॉल केला, मात्र त्याने कॉल घेतला नाही. त्यामुळे तो गिरगाव येथे गेला होता. यावेळी त्याला बैजनाथ हा कारमध्येच बेशुद्धावस्थेत पडल्याचे तसेच त्याचे दोन्ही हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्याने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते. उपचारादरम्यान त्यांना काही अज्ञात व्यक्तींनी बैजनाथला बेशुद्ध करुन त्याचे हातपाय बांधून कार्यालयातील सुमारे पावणेतीन कोटीची कॅश पळवून नेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानंतर या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकार्यांनी सुरु केला होता. याच गुन्ह्यांत बैजनाथला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो विसंगत माहिती देत होता. घटनास्थळीच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर तिथे असा प्रकार घडला नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्याच्या मोबाईलचे सीडीआर काढून पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो इब्राहिम शेखच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर इब्राहिमला पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले.
चौकशीत बैजनाथने हा संपूर्ण कट रचल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर बैजनाथ गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. या दोघांना मनिष पॉल या आरोपीने मदत केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांकडून गुन्ह्यांतील काही कॅश हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.