मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – रॉबरीच्या उद्देशाने काळबादेवी परिसरातील एका अंगाडिया व्यापार्यावर गोळीबार करुन सुमारे 47 लाखांचे सोन्याचे दागिन्यांच्या लुटप्रकरणी वॉण्टेड असलेल्या तिसर्या आरोपीस दिल्ली येथून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जावेद माजिद शेख असे या आरोपीचे नाव असून तो गुन्हा दाखल होताच पळून गेला होता. अखेर त्याला दिड महिन्यानंतर गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिराग धंदुकिया हे काळबादेवी येथील रामवाडी परिसरात राहत असून ते अंगाडिया व्यापारी म्हणून काम करतात. त्यांची स्वतची एक कुरिअर सर्व्हिस कंपनी आहे. 6 जानेवारीला रात्री साडेदहा वाजता ते त्यांच्या पुतण्यासोबत 47 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन गोवा येथे जात होते. पी. डिमेलो रोडवरुन जाताना त्यांना चारजणांच्या टोळीने थांबवून त्यांच्यासह पुतण्याला बेदम मारहाण केली. त्यांच्या दिशेने गोळीबार करुन दहशतीचे वातावरण निर्माण करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना किरण धनावडे ऊर्फ नाना याला एल. टी मार्ग तर हारुण नूर मोहम्मदीया ऊर्फ घाची याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. या दोघांकडून पोलिसांनी साडेसोळा लाखांचे चोरीचे दागिने जप्त केले होते. या दोघांच्या अटकेने मोहम्मद जावेद हा पळून गेला होता. अटकेच्या भीतीने तो सतत स्वतचे वास्तव्य बदलत होता. मुंबईतून पळून गेल्यानंतर त्याचा पोलिीसांनी दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब राज्यात शोध घेतला. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता. काही दिवस उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे लपून बसल्यानंतर तो दिल्लीला आला होता.
दिल्लीतून तो केरळला पळून जाण्याच्या तयारीत होता. ही माहिती प्राप्त होताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीला गेले होते. यावेळी केरळला जाण्याच्या तयारीत असलेल्या मोहम्मद जावेदला पोलिसांनी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन परिसरातून शिताफीने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सव्वाचार लाखांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. मोहम्मद जावेदच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.