एमटीएमची कॅश पळविणार्या पाचजणांच्या टोळीस अटक
बंगलोरच्या रहिवाशी असलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – एटीएममध्ये पैसे भरताना एका व्यक्तीच्या तोंडावर स्प्रे मारुन त्यांच्याकडील कॅश घेऊन पळून गेलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात डी. एन नगर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. प्रविण गोपाल, श्रीराम मुर्गन, अर्जुन विघ्नेश वेलू, गणेश लोकेश आणि अनिलकुमार इलूमलाई अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण बंगलोरचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाईल, दहा लाखांची कॅश, आणि गुन्ह्यांत वापरलेले दोन बाईक जप्त केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींच्या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राकेश संपतलाल पटेल हे अंधेरीतील अपना बाजार जवळ राहतात. बुधवारी 19 मार्चला सकाळी सव्वासहा वाजता ते अंधेरीतील जे. पी रोडवर असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. एटीएममध्ये पैसे भरत असताना अचानक तिथे काही तरुण आले. काही कळण्यापूर्वीच त्यापैकी एका तरुणाने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारुन त्यांच्याकडील 77 हजाराची कॅश असलेली बॅग चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर राकेश पटेल यांनी डी. एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर राजेंद्र मचिंछर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनित घाडगे, पोलीस हवालदार गायकवाड, हळदे, पोलीस शिपाई मंगेश राजने, धनाजी पांढरे, शशिकांत बांगर, गायकवाड, काकडे आणि महिला पोलीस शिपाई पवार यांनी एटीएमसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. तपासात दोन बाईकवरुन आलेल्या पाच आरोपींनी हा गुन्हा केल्याचे फुटेजवरुन दिसून आले होते. त्यानंतर या पथकाने जे. पी रोड, एस. व्ही. रोड, वाकोला, खेरवाडी, समतानगर, मालाड, गावदेवी पेडर रोड, ताडदेव परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन बाईकच्या मालकाचा शोध घेतला होता. तपासात त्या दोन्ही बाईक त्याच्या मालकीच्या असून त्याने त्या भाड्याने दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आरोपींचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. यावेळी संबंधित आरोपी ट्रॅव्हेल्स बसमधून खेडच्या दिशेने निघाल्याचे पोलिसांना समजले.
या माहितीनंतर पळून गेलेल्या पाचही आरोपींना खेडच्या शिवापूर येथून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून सुमारे दहा लाखांची कॅश, एक मोबाईल आणि गुन्ह्यांतील दोन्ही बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणल्यानंतर अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पाचही आरोपी बंगलोरच्या आरटीनगर, चामुंडीनगर, हाटीनगरख्या मलाराम पाड्याचे रहिवाशी आहे. गुन्हा करण्यासाठी ते सर्वजण मुंबईत येत होते. गुन्हा केल्यानंतर ते ट्रॅव्हेल्स बसमधून पुन्हा बंगलोर पळून जात होते. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.