मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – नोटा बदलण्याचा बहाणा करुन बोरिवली रेल्वे स्थानकात आलेल्या एका व्यावसायिकाची साडेचार लाखांची कॅश पळविणार्या कटातील अन्य पाच आरोपींना बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. टायगर ऊर्फ आजम मंसुर अहमद शेख, रवी मंगलप्रसाद रॉय, धर्मेंद्र तानाजी माने, राजू नवलकिशोर झा आणि प्रदीप कृष्णा करंजोळकर ऊर्फ कुलकर्णी अशी या पाचजणांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांतील आरोपींची संख्या सहा झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत या कटातील मुख्य आरोपी यशवंत अशोक मंचेकर याला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख 87 हजाराची कॅश हस्तगत केली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी एम खुपेरकर यांनी सांगितले.
गणेश सुभाषचंद्र सिसोदिया हे भाईंदरचे रहिवाशी असून त्यांचा करन्सी एक्सचेंजचा व्यवसाय आहे. ग्राहकांकडून आलेल्या फाटलेल्या जुन्या नोटा, चलनात बंद झालेल्या रिझर्व्ह बँकेला देऊन त्याऐवजी दुसर्या नोटा घेऊन ग्राहकांना देण्याचे काम आहे. या कामासाठी ते ग्राहकांकडून दहा ते पंधरा टक्के कमिशन घेतात. 8 सप्टेंबरला त्यांच्या परिचित मनोज नावाच्या एका एजंटने त्यांना कॉल करुन ओमकार मंचेकर या व्यक्तीकडे दोन हजार रुपयांच्या सात लाखांच्या साडेतीनशे नोटा आहे. त्या नोटा बदलून हव्या आहेत असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला पंधरा टक्के कमिशन घेऊन उर्वरित नवीन नोटा देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने त्यांना बोरिवलीतील गोरा गांधी हॉटेल येथे भेटण्यास बोलाविले होते. 9 सप्टेंबरला सकाळी ते मनोजसोबत गोरा गांधी हॉटेलजवळ आले होते.
ठरल्याप्रमाणे ते 12 सप्टेंबरला सहा लाख रुपये घेऊन आले होते. सायंकाळी चार वाजता तिथे ओमकार आला. याच दरम्यान तिथे काही तरुण आले. त्यांनी त्यांच्याकडे पाहून इशारा केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच गणेश सिसोदिया हे पळू लागले. ते लोकलमध्ये चढले असता त्यांच्या मागून ते तिघेही आले आणि त्यांनी त्यांच्याकडील एक बॅग घेऊन पलायन केले. या बॅगेत साडेचार लाखांची कॅश होती. दिड लाखांची कॅश सोडून ते चौघेही साडेचार लाखांची कॅश घेऊन पळून गेले होते. या घटनेनंतर ओमकार मंचेकर हादेखील पळून गेला होता. त्यानेच इतर सहकार्याच्या मदतीने ही लुटमार केल्याचा संशय व्यक्त करुन गणेश सिसोदिया यांनी बोरिवली रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ओमकारसह इतर तिघांविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा रावखंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस हवालदार शेख, देखरुखकर, भोजणे, नरवडे, इंगळे, शिंदे, खाडे, कवठेकर, पोलीस शिपाई चौधरी, घुटे, कोळी, पवार, शिरोसे, कांबळे, सालकर, खोटे यांनी तपास सुरु केला होता. या पथकाने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या यशवंत ऊर्फ ओमकार मंचेकर याला अटक केली होती. चौकशीत त्याने त्याच्या इतर पाच सहकार्यांची नावे सांगितली होती.
त्याच्या माहितीवरुन या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून आजम शेख, रवी रॉय, धर्मेद्र माने, राजू झा आणि प्रदीप करंजोळकर या पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख 87 हजाराची कॅश हस्तगत केली आहे. यातील यशवंत हा टोळीचा म्होरक्या असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहे. आजम, रवी, राजू आणि धर्मेद्र हे मिळेल तिथे कॅटरर्समध्ये वेटरचे काम करत होते.
ते सर्वजण कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलजवळील फुटपाथवर राहतात. यशवंत आणि प्रदीप हे ांगले मित्र असून प्रदीप हा शूटींगमध्ये ड्रेसमनचे काम करतो. सध्या त्याच्याकडे काहीच कामधंदा नव्हता. त्यामुळे त्याने यशवंतला या गुन्ह्यांत मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा घडल्यानंतर सहाही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांच्यासह त्यांच्या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले होते.