सोशल मिडीयावरुन रोहित शेट्टी व रणवीर सिंह यांना पुन्हा धमकी
लॉरेन्स बिष्णोईच्या हॅरी बॉक्सरकडून धमकी आल्याचा संशय
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बॉलीवूडचे निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील राहत्या घराजवळ गोळीबारानंतर सिनेअभिनेता रणवीर सिंह यांना आलेल्या धमकीची घटना ताजी असताना शुक्रवारी रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह यांना पुन्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या धमकीने बॉलीवूडमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमकीबाबत या दोघांनीही पोलिसांत तक्रार केली नाही, मात्र पोलिसांनी स्वतहून या धमकीचा तपास सुरु केला आहे. खंडणीविरोधी पथकाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे. या धमकीमागे गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा अत्यंत जवळचा सहकारी असलेल्या हॅरी बॉक्सरचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत बिष्णोई टोळीकडून बॉलीवूडच्या सिनेकलाकारांना धमकी दिली जात आहे. सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीजवळ दहशतीसाठी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा पोलिसांनी पर्दाफाश करुन गुन्ह्यांतील सर्वच आरोपींना अटक केली होती. अटकेनंतर त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. ते सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
या घटनेनंतर अलीकडेच रोहित शेट्टीच्या जुहू येथील शेट्टी हाऊस घराजवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत आहे. या गोळीबारानंतर अभिनेता रणवीर सिंह यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र रणवीरकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या
घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता पुन्हा रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोईचा सहकारी हॅरी बॉक्सर याने ही धमकी दिल्याचा दावा आहे. त्याने सोशल मिडीयावर एक संदेशासह ऑडिओ शेअर केला होता. त्यात त्याने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. ते दोघेही टोळीच्या रडारवर आहे. रणवीर हा आपल्या शब्दापासून मागे हटला असा आरोप करुन हॅरी बॉक्सरने त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. त्याच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी घटना घडणार आहे. त्याला पोलिसांत तक्रार करण्यास आवडते ना. आता बघ आम्ही काय करतो असेही नमूद करण्यात आले आहे.
त्याच्याकडे काम करणार्या प्रत्येक कर्मचार्याचा डाटा आमच्याकडे आहे. याच कर्मचार्यांना टार्गेट केले जाणार आहे असेही त्याने धमकी दिली आहे. हॅरी बॉक्सर ऊर्फ हरिश्चंद्र जाट हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. बॉक्सर म्हणून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. नंतर तो बिष्णोई टोळीत सामिल झाला होता. टोळीसाठी त्याने अनेक व्यापारी आणि उद्योगपतींना खंडणीसाठी धमकी दिली आहे. त्यात राजस्थान, दिल्ली आणि पंजाबमधील बड्या व्यापार्यासह व्यावसायिकांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो विदेशात राहून बिष्णोई टोळीचे सूत्रे सांभाळत आहे. दरम्यान या धमकीची पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही, मात्र वरिष्ठांकडून या धमकीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याची शहानिशा करण्याचे आदेश खंडणीविरोधी पथकाला देण्यात आले आहे.