रोहित शेट्टी यांच्या घराजवळ गोळीबार कटातील आरोपी गजाआड

गुन्हे शाखेसह उत्तरप्रदेश एसटीएफची संयुक्तपणे कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – फेब्रुवारी महिन्यांत प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराजजवळ गोळीबार करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस उत्तरप्रदेशातून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि एसटीएफच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. प्रदीप राधामोहन शर्मा ऊर्फ गोलू असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जात असून त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत अटक झालेला गोलू हा चौदावा आरोपी आहे.

1 फेब्रुवारी 2026 रोजी रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गोळीबाराच्या या घटनेने बॉलीवूडमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आतापर्यंत पोलिसांनी तेरा आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू याचे नाव समोर आले होते. त्याने शुभम लोणकर याच्या सांगण्यावरुन बॉलीवूडसह उद्योग जगतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

या गोळीबारानंतर तो पळून गेला होता. गेल्या दिड महिन्यांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. तांत्रिक माहितीवरुन प्रदीप शर्मा हा उत्तरप्रदेशात लपला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी उत्तरप्रदेशच्या एसटीएफच्या मदतीने प्रदीपच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. एसटीएफचे पोलीस निरीक्षक आकाश सिंह, उपनिरीक्षक योगेंद्र सिंह, मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्निल काळे व अन्य पोलीस पथकाने प्रदीपला महावीरनगर परिसरातून शिताफीने अटक केली.

तपासात त्यानेच रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार कटात सहभागी असल्याची कबुली दिली. प्रदीप हा मूळचा उत्तरप्रदेशच्या आग्रा, मोहल्ला महावीरनगरचा रहिवाशी आहे. शुभम लोणकर याच्या सोशल मिडीयावरील पोस्ट पाहून प्रभावित होऊन तो त्याच्या टोळीत सामिल झाले होते. त्याचा सहकारी शिवम अनिल दुबे याच्या मदतीने त्याने इतर आरोपींना याकामी तयार केले होते. त्यानंतर दिपकने इतर सहकार्‍याच्या मदतीने हा गोळीबार घडवून आणला होता.

याच गुन्ह्यांत शिवम दुबेसह इतर पाच आरोपींना 28 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी गुन्ह्यांतील पिस्तूल पोलिसांनी जप्त केले होते. या अटकेनंतर प्रदीप शर्मा हा पळून गेला होता. अटकेच्या भीतीने तो स्वतचे वास्तव्य सतत बदलत होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. ट्रॉन्झिंट रिमांड मिळाल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते. त्याला रविवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page