रोहित शेट्टी फायरिंगप्रकरणात मुंबई पोलिसांची धडक कारवाई

हरियाणा-उत्तरप्रदेशातून मुख्य शूटरसह सातजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बॉलीवूडसह उद्योग जगतात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराजवळील फायरिंगप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने हरियाणा व उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने आग्रा, नोएडा, जनपद झज्जर परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत एका मुख्य शूटरसह सातजणांना पोलिसांनी अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले. दिपक रमेशचंद्र शर्मा, सनी राकेशकुमार, सोनू विनोदकुमार ठाकूर, रितिक विनोदकुमार यादव, विष्णू सुरजपाल कुशवाह, जतीन रत्नेश भारद्वाज आणि विशाल बालकराम अशी या सातजणांची नावे असून ते सर्वजण आग्रा, गौतमबुद्धनगर, गाजियाबाद, साहिदाबाद आणि इटावाचे रहिवाशी आहे. त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्यांनतर त्यांना सोमवारी दुपारी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आता सात आरोपींना अटक झाली असून त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.

31 जानेवारीला रात्री उशिरा रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी हाऊसजवळ काही अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केले होते. या फायरिंगमध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जुहू पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले होते. हा तपास हाती येताच दुसर्‍या दिवशी स्वप्निल बंडू सकट, समर्थ शिवशरण पोमाजी, सिद्धार्थ दिपक येनपुरे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी या चौघांना पुण्यातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आसाराम श्रीरंग फासलेला पुण्यातून अटक केली होती. अलीकडेच त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर सर्वांना 11 फेब्रुवारीला मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सर्वांना मोक्का कोर्टाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

त्यांच्या चौकशीनंतर या कटातील इतर आरोपींच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. आरोपींची माहिती काढताना या पथकाला काही आरोपी उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्यात लपले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय तरळगट्टी, सुनिल पवार, अरुण थोरात, लक्ष्मण साळुंखे, रविंद्र मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, रामदास कदम, अजय बिराजदार, प्रताप बंडगर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे विशेष पथक उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने हरिणा आणि उत्तरप्रदेश एसटीएफच्या मदतीने उत्तरप्रदेश व हरियाणाच्या आग्रा, नोएडा आणि जनपद झज्जर आदी परिसरातून मुख्य शूटरसह सातजणांना अटक केली होती.

यातील दिपक शर्मा हा मुख्य शूटर असून त्याने रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग केले होते. ते सर्वजण शुभम लोणकर याच्यासाठी काम करतात. शुभमने लॉरेन्स बिष्णोईच्या मदतीने स्वतची टोळी बनविली होती. या टोळीला शुभमला लॉजिस्टिक मदत केली होती. रोहित शेट्टी यांच्या आरोपींना त्याने आर्थिक मदतीसह शस्त्रे आणि वाहन पुरविले होते. यातील बहुतांश आरोपी शुभमच्या सोशल मिडीयाच्या पोस्ट पाहून प्रभावित झाले होते. त्यानंतर त्याने शुभमसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना टोळीसाठी मोठी कामगिरी करायची होती. रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग करुन शुभमला बॉलीवूडसह उद्योग जगतात स्वतची दहशत निर्माण करायची होती. दशहत निर्माण केल्यानंतर त्यांच्याकडून त्याला कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल करायची होती. त्यासाठी त्याने टोळीत अनेक तरुणांना सामिल करुन घेतले होते.

त्यांना कामासाठी भरमसाठ पैसे देण्याची ऑफर देण्यात आली होती. रोहित शेट्टी यांच्या घराची रेकी करुन सर्वांनी मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन केल्यानंतर ते सर्वजण शेट्टी हाऊसजवळ गेले आणि तिथे त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर ते सर्वजण विलेपार्ले रेल्वे स्थानकातून कल्याणमार्गे पुणे, उत्तरप्रदेश आणि हरियाणात पळून गेले होते. अटकेनंतर सातही आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतनू अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग केल्यानंतर शुभमने रणवीर सिंहला खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्याचा सहकारी हॅरी बॉक्सर याच्यावर खंडणीच्या धमकीची जबाबदारी सोपविली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page