रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग करणार्‍या आरोपींवर मोक्का

बॉलीवूडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी फायरिंग

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराजवळ फायरिंग करणार्‍या पाचही आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. या कारवाईनंतर या पाचही आरोपींना बुधवारी दुपारी मोक्का कोर्टाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींमध्ये आसाराम श्रीरंग फासले ऊर्फ बाबू, स्वप्निल बंडू सकट, समर्थ शिवशरण पोमाजी, सिद्धार्थ दिपक येनपुरे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी यांचा समावेश होता. बॉलीवूडमध्ये दशहतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी या आरोपींनी शुभम रामेश्वर लोणकर ऊर्फ शुब्बू याच्या सांगण्यावरुन रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग केल्याचे आतापर्यंत तपासात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही घटना केवळ हिमखंडाचे टोक असल्याचे निरीक्षक नोंदविण्यात आले आहे.

रोहित शेट्टी हे जुहू येथील शेट्टी हाऊस या दहा मजली इमारतीमध्ये राहतात. 31 जानेवारीला रात्री उशिरा त्यांच्या घराजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला हेता. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. रोहित शेट्टी यांना कुठल्याही गुंड टोळीकडून जिवे मारण्याची किंवा खंडणीसाठी धमकी आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या घराजवळ झालेल्या फायरिंगच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी जुहू पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले होते. हा तपास हाती येताच दुसर्‍या दिवशी स्वप्निल सकट, समर्थ पोमाजी, सिद्धार्थ येनपुरे, आदित्य गायकी या चौघांना पुण्यातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आसारामला पुण्यातून अटक केली होती.

ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत होते. त्यांच्या चौकशीत रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग करण्यामागे बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा कट होता असे उघडकीस आले होते. त्यामुळे या पाचजणांवर बुधवारी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना बुधवारी दुपारी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटाचा मुख्य आरोपी शुभम लोणकर असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या आरोपींना शुभमचा भाऊ प्रविण याने फायरिंगसाठी शस्त्रे पुरविली होती.

प्रविण हा सध्या बाबा सिद्धीकी हत्येत न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहे. जेलमध्ये असताना त्याने आरोपींना शस्त्रे पुरविल्याने त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. चौकशीनंतर त्याला या गुन्ह्यांत अटक होईल असे बोलले जाते. न्यायालयात हजर केलेल्या आरोपींच्या वतीने त्यांचे वकिल सचिल झाल्टे आणि अजिंक्य मिरगल यांनी नवीन रिमांड अर्जाला विरोध करताना त्यात काहीही नवीन नाही.

केवळ मोक्का लावून पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे. प्रविण लोणकरने शस्त्रे पुरविल्याच्या आरोपाचे वकिलांनी खंडन केले. कारण तो गेल्या वर्षांपासून जेलमध्ये आहे. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींनाा पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना सत्य बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज असल्याचे मत नोंदविले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page