म्हाडाचे रुम ट्रान्स्फर करुन देतो सांगून बहिण-भावांची फसवणुक
दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या इस्टेट एजंटला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील महावीरनगर, म्हाडा कॉलनीत म्हाडाचे रुम ट्रान्स्फर करुन देतो असे सांगून एका बहिण-भावांची सुमारे बारा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या कटातील मुख्य आरोपी आदित्य रजनीकांत वाघेला (27) याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. आदित्य हा वरळी येथे राहत असून इस्टेट एजंट म्हणून काम करतो. अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तो पळून गेला, अखेर दहा महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
दिनेशकुमार जयराम शाहू हे बोरिवली परिसरात राहतात. सुरेखा जयप्रकाश साहू ही त्यांची बहिण आहे. या दोघांच्या मालकीचे न्यू एमएचबी कॉलनी परिसरात म्हाडाचे दोन रुम होते. मात्र या इमारती तोडल्यामुळे त्यांना म्हाडातर्फे बोरिवलीतील गोराई, म्हाडा कॉलनीतील ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात घर दिले आहेत. गेल्या वर्षी त्यांची वरळीयेथे राहणार्या आदित्य वाघेला या इस्टेट एजंटशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्याची म्हाडामध्ये चांगली ओळख असून तो काही लोकांचे म्हाडाचे रुम कांदिवलीतील महावीरनगर येथे ट्रान्स्फर करुन देतो असे सांगितले. सुरेखा साहू हिच्या मुलाचे लग्न ठरले होते, गोराईतील रुम लहान असल्याने तिने त्याला महावीरनगर येथे रुम ट्रान्स्फर करुन देण्याची विनंती केली होती. यावेळी आदित्यने दिनेशकुमार आणि सुरेखा यांना रुम ट्रॉन्स्फर करण्याचे आश्वासन देत त्यासाठी काही खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर त्याने दोन्ही रुम ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्याकडे चौदा लाखांची मागणी केली होती.
मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्याला बारा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला आधी तीन लाख आणि नंतर कर्ज काढून नऊ लाख असे बारा लाख दहा हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने त्यांना वांद्रे येथील म्हाडा कार्यालयातील जावक क्रमांक पत्र 5482/2024 दिले होते. यावेळी त्याने त्यांना लवकरच महावीरनगर येथे रुम ट्रान्स्फरचे पत्र मिळेल असे सांगितले. या पत्राची त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन चौकशी केली होती, यावेळी त्यांच्याकडे असलेले पत्र बोगस असल्याचे एका अधिकार्याने सांगितले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आदित्यला जाब विचारुन त्याच्याकडे रुम ट्रान्स्फरसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यान त्यांचे पैसे परत केले नाही.
कांदिवलीतील महावीरनगर, म्हाडा कॉलनीत रुम ट्रान्स्फर करुन देतो असे सांगून आदित्यने त्यांच्याकडून घेतलेल्या बारा लाख दहा हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एमएचबी पोलिसांना सांगून आदित्यविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आदित्यविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आदित्य हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आदित्यला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.