रिवॉर्ड पॉईटच्या नावाने वयोवृद्धासह दोघांची फसवणुक
दोन्ही गुन्ह्यांत सव्वासहा लाखांचा सायबर ठगाकडून अपहार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मार्च २०२४
मुंबई, – रिवॉर्ड पॉईटच्या नावाने एका वयोवृद्ध बिल्डरसह दोघांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याची घटना वांद्रे व मालाड परिसरात उघडकीस आली आहे. दोन्ही गुन्ह्यांत ठगांनी सुमारे सव्वासहा लाखांचा अपहार केला. याप्रकरणी वांद्रे आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
वांद्रे येथे राहणारे फतु नानीकराम निहालानी हे व्यवसायाने बिल्डर आहेत. शनिवारी २ मार्चला त्यांना त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. त्यात त्यांनी पावणेदहा हजाराचे रिवॉर्ड जिंकले असून मॅसेजमधील लिंकवर त्यांची वैयक्तिकसह बँकेची माहिती शेअर करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली असता बँकेचे एक बोगस पेज ओपन झाले होते. बँकेचे अधिकृत पेज असल्याचे समजून तयांनी त्यात त्यांच्या बँक खात्याचा कस्टमर आयडी, पासवर्ड, पॅनकार्डसह इतर माहिती शेअर केली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर तीन वेगवेगळे ओटीपी क्रमांक आला होता. तिन्ही क्रमांक शेअर केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या दोन्ही बँकेत खात्यातून तीन ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून ४ लाख ३९ हजार रुपये त्यांच्या खात्यातून अन्य बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसांना ही माहिती दिली होती.
अशाच प्रकारे अन्य एका घटनेत एका ५९ वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे दोन लाखांची फसवणुक केली. निर्मल चंद्रकुमार जैन हे मध्यप्रदेशच्या इंदौरचे रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांचा कन्हैयालाल नावाचा लहान भाऊ मालाड येथे राहतो. २४ फेब्रुवारीला त्याला हृदयविकराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे निर्मल जैन हे त्याला पाहण्यासाठी मुंबईत आले होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते भावाच्या मालाड येथील घरी होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून त्यांना ९ हजार ८५० रुपयांचे रिवॉर्ड मिळाले आहे. त्याची मुदत आजच संपणार आहे. त्यामुळे मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर रिवार्ड पॉईट मिळविण्याची विनंती केली. त्यांनी लिंक ओपन करुन त्यांची माहिती शेअर केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ८८ हजार रुपये डेबीट झाले होते. त्यामुळे त्यांनी मालाड पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर वांद्रे आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांचा पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.