रांगोळीच्या माध्यमातून शहिद पोलिसांना अभिवादन

रुपेश केळुसकर यांच्या रांगोळीची न्यायालयात चर्चा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पोलीस शहिद दिनानिमित्त मुंबई पोलिसांकडून विविध कार्यक्रमांतून शहिद पोलिसांना श्रद्धाजंली अर्पण केली जात असताना बोरिवलीतील मुख्य अतिरिक्त दंडाधिकारी न्यायालयात लिपीक म्हणून काम करणार्‍या रुपेश चंद्रकांत केळुसकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून शहिद पोलिसांना अभिवादन केले होते. त्यांच्या रांगोळीची सोमवारी दिवसभर न्यायालयात चर्चा होती. अनेकांनी त्यांनी पोलीस शहिद दिनानिमित्त काढलेल्या रांगोळीचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे रुपेश केळुसकर यांनी यापूर्वी विविध सणांसह दिन विशेष दिवशी न्यायालयात रांगोळी काढून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

  

२१ ऑक्टोंबर हा पोलीस शहिद दिवस म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहिद झालेल्या हुतात्मांना पोलिसाकडून पुष्पचक्र वाहून श्रद्धाजली अर्पण केली जाते. सोमवारी नायगाव पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतीस्तंभावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धाजंली अर्पण केली होती. यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, प्रतिनिधी वरिष्ठ पेालीस अधिकारी आणि निमंत्रितांनी पोलीस स्मृतीस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवान केले. बोरिवलीतील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयात लिपीक रुपेश चंद्रकांत केळुसकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून शहिद झालेल्या पोलिसांना श्रद्धजंली अर्पण केली आहे. त्यांच्या या रांगोळीची संपूर्ण दिवसभर स्थानिक न्यायालयात चर्चा होती, अनेकांनी रांगोळीच्या माध्यमातून शहिद पोलिसांना दिलेल्या अभिवादनाबाबत त्यांचे कौतुक केले आहे.

रुपेश केळुसकर हे कुलाबा परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते बोरिवलीतील मुख्य अतिरिक्त दंडाधिकारी न्यायालयात लिपीक म्हणून काम करतात. लहानपणापासून त्यांना रांगोळी काढण्याची आवड होती. गेल्या पाच ते सहा वर्षांत ही आवड आणखीन वाढत गेली. संस्कार भारतीसह अक्षर रांगोळीची त्यांना आवड आहे. विशेष म्हणजे कुठलीही शिकवणी न घेता रुपेश केळुसकर हे प्रत्येक सणासह दिन विशेष दिवशी न्यायालयात रांगोळी काढून सर्वांना लक्ष वेधून घेतात. ऑनलाईन रांगोळी तसेच रांगोळी कलाकारांचे व्हिडीओ पाहून रुपेश केळुसकर हे रांगोळीतील काही त्रुटी आणि उणीव भरुन काढतात. गेल्या वर्षी गोरेगाव, दिडोंशीतील नागरी निवारा येथे संस्कार भारतीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांच्या रांगोळीला प्रथम क्रमांकाचे पारितोषित आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page