मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – जोगेश्रीतील रायन ग्लोबल शाळेत बॉम्ब ठेवला असल्याचा एक मेल प्राप्त होताच शाळेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण शाळेची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. या आरोपीचा गुन्हे शाखेचे अधिकारीही शोध घेत आहेत.
जोगेश्वरीतील ओशिवरा परिसरात रायन ग्लोबल नावाची एक शाळा आहे. या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा एक मेल आला होता. ही माहिती तेथील कर्मचार्यांनी वरिष्ठांसह ओशिवरा पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर ओशिवरा पोलिसांनी बॉम्बशोधक नाशक पथक आणि श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण शाळेची इमारत खाली केल्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी केली होती. संपूर्ण शाळेची तपासणी केल्यानंतर या पोलिसांना कुठेही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याचा मेल बोगस असल्याचे उघडकीस आली आहे. ही धमकी अफजल गॅगकडून देण्यात आल्याचे बोलले जाते.
बॉम्ब असल्याचा मेल पाठवून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण करणे, खोटी माहिती पसरविणे आदी कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलसह अनेक खाजगी आणि शासकीय हॉस्पिटल, आरबीआय मुख्यालय उडवून देण्याची धमकीसह मेल पोलिसांना प्राप्त झाले आहे. मात्र ते सर्व बोगस कॉल व मेल असल्याचे तपासणीनंतर उघडकीस आले होते. दिल्ली शहरात अशाच प्रकारे डिसेंबर महिन्यांत रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्बची धमकी आली होती.