रस्ता क्रॉस करताना रिक्षाची धडक लागून वयोवृद्धाचा मृत्यू
अपघातानंतर पळून गेलेल्या रिक्षाचालकाचे आत्मसमर्पण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जून 2025
मुंबई, – रस्ता क्रॉस करताना रिक्षाची धडक लागून झालेल्या एका साठ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. मृत वयोवृद्धाची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर पळून गेलेल्या रिक्षाचालकाने दुसर्या दिवशी सहार पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. सोहराब महफुज हुसैन शेख असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हा अपघात सोमवारी 9 जूनला सकाळी साडेआठ वाजता अंधेरी-कुर्ला रोडने अंधेरीकडे ाजणार्या मेट्रो स्टेशन गेट क्रमांक चारजवळील उत्तर वाहिनीवर झाला. किशोर अण्णा खरात हे सहार पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी 9 जूनला ते दिवसपाळी कर्तव्यावर हजर होते. सकाळी मेट्रो स्टेशन गेट क्रमांक चारजवळ एक अपघात झाला असून एक वयोवृद्ध व्यक्ती झाला आहे, पोलीस मदतीची गरज असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त झाली होती. या माहितीनंतर किशोर खरात यांच्यासह अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना एक वयोवृद्ध जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
सकाळी साडेअकरा वाजता उपचारादरम्यान या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. त्याच्याकडे त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. याप्रकरणी सहार पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासणीनंतर हा अपघातामागे एका रिक्षाचालकाचा सहभाग उघडकीस आला होता. या रिक्षाच्या धडकेने वयोवृद्धाचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर तो त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोहराब शेख हा दुसर्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याने त्याच्या रिक्षाच्या धडकेने या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. अपघातानंतर तो घाबरला अणि पळून गेला होता असे सांगितले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले. तपासात मृत वयोवृद्ध भिक्षेकरी असून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो परिसरात भीक मागून मिळेल ते खाऊन स्वतचा उदरनिर्वाह करीत असल्याचे उघडकीस आले आहे.