मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 फेब्रुवारी 2026
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून चारशे मिटर अंतरावर असलेल्या हॉटेलवर सोडण्यासाठी एका टॅक्सीचालकाने अमेरिकन महिलेकडून अठरा हजार रुपयांचा भाडा घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहार पोलिसांनी अशा टॅक्सीचालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच गुन्ह्यांतील एका मुख्य आरोपी टॅक्सीचालक मोहम्मद तौफिक शेख याला सहार पोलिसांनी अटक केली. त्याने अशाच प्रकारे तीन प्रवाशांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले असून त्याच्याविरुद्ध सहार आणि विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने शुक्रवार 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अर्जेटिना अरियानो ही महिला अमेरिकेची रहिवाशी आहे. 12 जानेवारीला ती अमेरिकेतून मुंबईत आली होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तिने एक टॅक्सी भाड्याने घेतली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तिचे हॉटेल अवघ्या चारशे मिटर अंतरावर होते, ही बाब माहित असूनही टॅक्सीचालकाने तिला पंधरा ते वीस मिनिट परिसरात फिरवले आणि नंतर तिला हॉटेलजवळ सोडले. त्यासाठी त्याने तिच्याकडून दोनशे डॉलर म्हणून अठरा हजार रुपये भाडा आकारला होता. 12 जानेवारीला अर्जेना हिने हॉटेलमध्ये चेक इन केले आणि दुसर्या दुसर्या दिवशी तिने चेक आऊट केले.
मुंबईतून ती पुणे आणि इतर शहरात गेली. अमेरिकेत परत केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. तिचा मॅसेज सोशल मिडीयावर प्रचंड गाजला होता. या पोस्टमध्ये तिने घडलेला प्रकार सविस्तर सांगितला होता. सोशल मिडीयावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सहार पोलिसांना तपासात आदेश दिले होते. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित विदेशी महिलेची हॉटेलमध्ये चौकशी केली होती, यावेळी ती हॉटेलमधून दुसर्या दिवशी निघून गेल्याचे समजले. त्यानंतर तिला पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,
मात्र तिच्याकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतहून तक्रार नोंदवून या गुन्ह्यांचा तपास सुरु केला होता. या महिलेने टॅक्सीचा क्रमांक तिच्या मॅसेजमध्ये नमूद केला होता. या क्रमांकावरुन नंतर यशराज यादव ऊर्फ पप्पू या टॅक्सीचालकाला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने चारशे मीटरच्या प्रवासासाठी विदेशी महिलेकडून अठरा हजार रुपये भाडा घेतल्याची कबुली दिली आहे. त्याची टॅक्सी पोलिसांनी जप्त केली होती. त्याच्या चौकशीत तौफिकचे नाव समोर आले होते,
या दोघांनी संगनमत करुन या महिलेची फसवणुक केली होती. मात्र यशराजच्या अटकेनंतर तो उत्तरप्रदेशातील गावी पळून गेला होता, अलीकडेच तो मुंबईत परत आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. 39 वर्षांचा तौफिकने अशाच इतर गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात दोन तर विमानतळ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तो इतर टॅक्सीचालकाच मदतीने ही फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.