ट्रेकिंगला गेलेल्या तरुणीचा सहकारी कर्मचार्‍याकडून विनयभंग

एकटीच असल्याचा फायदा घेऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२४
मुंबई, – कंपनीच्या सहकारी मित्रांसोबत बदलापूर येथील ट्रेकिंगला गेलेल्या एका तरुणीचा फ्लॅटमध्ये तिच्या सहकारी मित्राने विनयभंग केला. याप्रकरणी शादाब खान या सहकारी कर्मचार्‍याविरुद्ध सहार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. फ्लॅटमध्ये एकटी असल्याचा फायदा घेऊन शादाबने तरुणीशी जवळीक साधून तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचे पोलिसांनी सांगितले.

२४ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मूळची गुजरातच्या वापीची रहिवाशी असून गेल्या तीन महिन्यांपासून अंधेरीतील मरोळ पाईप लाईन परिसरात राहते. याच परिसरातील एका खाजगी कंपनीत ती सप्लाय विभागात कामाला आहे. १ जुलैला कंपनीच्या कर्मचार्‍यांचा बदलापूरच्या कोंडेश्‍वर येथे ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन ठरला होता. ठरल्याप्रमाणे ६ जुलैला ती तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत बदलापूर येथे मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी ट्रेकिंगला जाणार होती. शनिवारी सहा वाजता ते सर्वजण बदलापूरला गेले. रात्री ते सर्वजण एका फ्लॅटमध्ये थांबले होते. जेवण झाल्यानंतर ते सर्वजण फ्लॅटमध्ये झोपले होते. एका फ्लॅटमध्ये ती तिच्या मैत्रिणीसह अभय आणि शादाबसोबत होती तर इतर मित्र दुसर्‍या फ्लॅटमध्ये होते. दुसर्‍या दिवशी तिला अभयने ट्रेकिंग जाण्यासाठी उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र झोप येत असल्याने तिने ट्रेकिंगला जाण्यास नकार दिला. त्यानंतर ते सर्वजण निघून गेले. यावेळी फ्लॅटमध्ये तिच्यासोबत शादाब हा एकटाच होता. काही वेळानंतर तो तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या छातीला अश्‍लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने तिला धक्काच बसला. तिने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करुन जाब विचारला . यावेळी त्याने ऍक्टिंग करु नकोस, मला माहित आहे मी काय करतो, तुला खूप मजा येईल असे अश्‍लील संभाषण करुन तिच्या जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती तिची बॅग भरुन फ्लॅटबाहेर निघून गेली.

घडलेला प्रकार तिने तिच्या मित्रांना सांगून तेथून निघून जाण्याची विनंती केली. त्यानंतर ते अंधेरीला आले. दोन दिवसानंतर तिने तिच्या कंपनीच्या एचआर मॅनेजरसह कंपनीच्या लैगिंक छळवणूक प्रतिबंधक समितीला हा प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने सहार पोलिसांत शादाब खानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच शादाबची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page