सहकारी महिलेशी जवळीक साधून त्रास देण्याचा प्रयत्न

कंपनीच्या सुपरवायझर अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – सहकारी महिलेशी जवळीक साधून तिचा मानसिक शोषण केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या सुपरवायझर अधिकार्‍याविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा प्रकार घडल्याने त्याची कंपनीसह स्थानिक पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.

28 वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर येथे राहते. तिचे पती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका खाजगी कंपनीत कॅशिअर म्हणून कामाला आहे तर याच कंपनीत ती जानेवारी 2025 पासून कॅशिअर म्हणून कामाला लागली होती. विमानतळावर येणार्‍या वाहनांची पार्किंगची सोय करणे, तासाप्रमाणे पैसे घेणे आदी कामाची जबाबदारी तिच्यावर आहे. कंपनीत एकूण तीन शिफ्ट असून एक आठवड्यात प्रत्येक कर्मचार्‍याची शिफ्ट बदलते. याच कंपनीत संतोष नावाचा आरोपी सुपरवायझर म्हणून कामाला आहे.

14 जानेवारीला तिला संतोषने मॅसेज करुन तो तिची घाटकोपर येथे वाट पाहत आहे. तिथे आल्यावर कॉल करण्यास सांगितले. यावेळी तिने त्याला ती बाईकवरुन येत असल्याचे सांगून त्याला पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर तो तिला नास्ता आणि भेटण्यासाठी सतत आग्रह करत होता. याच दरम्यान कंपनीच्या एका कर्मचार्‍याने तिला संतोष सरांच्या मागण्या पूर्ण केल्यास तिला फायदाच होईल. त्यांच्याकडून आर्थिक मदत, ने-आण करण्यासाठी सेवा, कामात प्रमोशन आणि इतर सवलती मिळतील असे सांगितले. मात्र तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

23 जानेवारीला त्याने तिला मॅसेज करुन कॉल करण्यास सांगितले. तो तिला कोणाचेही ऐकू नकोस, जर मी ठरविले तर तुला मॅनेजर किंवा सुपरवायझर बनवू शकतो. सर्व माझ्या हातात आहे असे सांगून अनेकदा जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. कामावर आणि घरी असताना संतोष तिला मोबाईलवर कॉल व मॅसेज करुन त्रास देत होता. मात्र ती प्रत्येक वेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तो काही दिवसांपासून तिच्यावर इतर कर्मचार्‍यांसमोर ओरडत होता.

तिच्या कामात चुका दाखवून लागला होता. त्यामुळे तिने त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याची त्याने वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला होता. त्यानंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी संतोष जाधवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page