मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – मैत्री तोडली म्हणून एका अठरा वर्षांच्या तरुणीची तिच्याच मित्राने मारहाण आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात घडली. सारा अम्रान इम्रान सय्यद असे या तरुणीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा आरोपी मित्र झैब ख्वाजा हुसैन सोलकर (२२) याला सहार पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर झैबला लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपीच्या वडिलांनी त्याला सहार पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजता अंधेरीतील मरोळ नाका, चिमटपाडा, पंजाब डेअरीसमोरील कादरी हाऊसमध्ये घडली. इर्शाद लियाकतअली सैय्यद हे टेम्पोचालक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, अशोक टॉवरजवळील सुलोचनाबाई चाळीत राहतात. सारा ही त्याच्या भावाची मुलगी असून ती तिच्या कुटुंबियांसोबत कादरी हाऊसमध्ये राहते. गेल्या तीन वर्षांपासून सारा आणि झैब हे दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांची चांगली मैत्री होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होते, त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले मैत्रीचे संबंध तोडून टाकले होते. त्याच्या त्याच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे रविवारी पहाटे साडेचार वाजता तो तिच्या घरी आला होता. तिच्या बेडरुममध्ये गेल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर कपड्याने साराची गळा आवळून हत्या केली होती. यावेळी साराचा भाऊ आणि बहिण हॉलमध्ये होते. या हत्येनंतर त्याने स्वतवर ब्लेडने हल्ला केला. काही वेळानंतर तो तेथून पळून गेला होता. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत तिचे नातेवाईक तिला घेऊन जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी सहार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करुन काही तासांत पळून गेलेल्या झैबला अटक केली. झैब हा जोगेश्वरी येथे राहत असून सध्या शिक्षण घेतो. साराची हत्या केल्यानंतर तो स्मशानभूमीत गेला होता. रात्री त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला होता, यावेळी त्याने घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला सहार पोलीस ठाण्यात आणले होते. त्याच्या चौकशीत त्याने साराने मैत्री तोडल्यानंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवार ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साराच्या हत्येनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.