कर्मचार्‍यांना मारहाण करुन विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न

केरळच्या प्रवाशाला अटक; गुप्तचर विभागाकडून चौकशी होणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – विमानातील कर्मचार्‍यांना मारहाण करुन एका प्रवाशाने अचानक विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने विमानातील कर्मचार्‍यासह इतर प्रवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी दुपारी हा धक्कादायक कालिकत-बेहरीनदरम्यान विमानात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भादवीसह विमान अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच अब्दुल मुसावीर नाडुकंडीईल या २५ वर्षांच्या केरळच्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची भारतीय गुप्तचर विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून अब्दुलची संबंधित अधिकार्‍यांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या कृत्यामागे त्याचा काय उद्देश होता, त्याला तसे करण्यास कोणी प्रवृत्त केले होते का, त्याचे कुठल्या अतिरेकी संघटनेशी संबंध आहे का याची चौकशी केली जाणार आहे.

ओम रमेश देशमुख हे घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज परिसरात राहत असून पाच वर्षांपासून एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड कंपनीत असोशिएट सिक्युरिटी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीच्या विमानाने शनिवारी सकाळी दहा वाजता कालिकत विमानतळावरुन बेहरीनला जाण्यासाठी उड्डान केले होते. बारा वाजता अब्दुल हा त्याच्या सीटवरुन उठला आणि त्याने विमानाच्या मागील बाजूस दरवाजाजवळील जाऊन काही कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर त्याने मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला या कर्मचार्‍यांनी पकडून जाब विचारला होता. त्याच्या या कृत्यामुळे विमानाला आणि विमानातील सर्व प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्याला बळाचा वापर करुन पुन्हा सिटमध्ये बसविण्यात आले होते. यावेळी त्याने विमानातील प्रवाशांना शिवीगाळ करुन तिथे प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याने पायलटने तातडीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे लँडिंग केले होते. हा प्रकार तिथे उपस्थित सुरक्षारक्षकांना दिल्यानंतर अब्दुलला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या घटनेची माहिती नंतर सहार पोलिसांना देण्यात आली.

याप्रकरणी ओम देशमुख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अब्दुलविरुद्ध ३२३, ३३६, ५०४, ५०६ भादवी सहकलम विमान अधिनियिम कायदा २२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अब्दुल हा मूळचा केरळचा रहिवाशी असून शनिवारी तो कालिकत-बेहरीन असा प्रवास करत होता. यावेळी त्याने अचानक विमानातील कर्मचार्‍यांना मारहाण करुन विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page