लग्नासाठी मुलीची सोशल मिडीयावर बदनामीची धमकी
अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – शेजारी राहणार्या एका जोडप्याचे लग्न लावून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये वसुल करुन दे अशी धमकी देत एका अज्ञात व्यक्तीने वडापाव विक्रेत्याच्या मुलीची बदनामीची धमकी दिल्याचा विचित्र प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसह शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
४३ वर्षांचे तक्रारदार अंधेरी परिसरात राहत असून त्यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. १७ जूनला त्यांच्या व्हॉटअपवर एका अज्ञात व्यक्तीने काही मॅसेज आणि व्हिडीओ पाठविले होते. तो पॉर्न व्हिडीओ होता. मॅसेज पाहिल्यानंतर त्यात त्यांच्या २३ वर्षांच्या मुलीविषयी आक्षेपार्ह मजकूर देण्यात आला होता. त्यात तिचे फोटो होते. या फोटोखाली तिच्याशी शारीरिक संंबंधाविषयी अत्यंत वादग्रस्त संभाषण करण्यात आले. काही वेळानंतर संंबंधित व्यक्तीने त्यांना कॉल करुन तो रिझवान बोलत आहे. त्याच्या शेजारी आदर्श आणि काजल हे राहत असून या दोघांकडून त्याला साडेचार लाख रुपये देणे बाकी आहे. ते पैसे तुम्ही मला वसुल करुन द्या. नाहीतर त्यांच्या मुलीची सोशल मिडीयावर बदनामी करु अशी धमकी दिली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याशी त्यांचे काहीही घेणेदेणे नाही, त्यामुळे तुला जे करायचे आहे ते कर असे सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांचे कॉल येऊ लागले. या व्यक्तीने त्यांनाही त्यांच्या मुलीविषयी आक्षेपार्ह मॅसेज पाठविले होते.
तीन दिवसांनी त्यांना पुन्हा रिझवान नाव सांगणार्या व्यक्तीने फोन करुन आदर्श आणि काजल यांचे लावून त्यांच्याकडून त्यांना पैसे वसुल करुन देण्याची मागणी केली. नाहीतर तुझ्या मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी त्याला या लग्नाशी माझे काहीही संबंध नाही असे सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने त्यांच्या नातेवाईकांना सोशल मिडीयावर अश्लील मॅसेज पाठवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर त्यांनी घडलेला प्रकार सहार पोलिसांना सांगून रिझवान नाव सांगणार्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३८४, ५०४, ५०६ भादवी सहकलम ६७, ६७ अ आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत सहार पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. आरोपीच्या अटकेनंतर या धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.