मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – महिलेने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेऊन अंडाकृती आकाराची कॅप्सूल शौचालयात टाकल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. या प्रकरणी सहार पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे सीमा शुल्क विभागात सहायक उप निरीक्षक आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभाग (एआययु) मध्ये कार्यरत आहेत. रविवारी एक महिला मस्कत येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. तक्रारदार याने तिला नाव विचारले. तिने तिचे नाव सांगून ती चेन्नई येथे राहत असल्याचे सांगितले. तिला मस्कतला कशासाठी गेल्या बाबत विचारणा केली. तेव्हा तिने तामिळ भाषेशिवाय कोणतीही भाषा येत नसल्याचे त्याना सांगितले. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिच्या साहित्याची तपासणी केली. महिलेच्या बॅगेत गडद रंगाची प्रतिमा दिसून आली. एआययूच्या अधिकाऱ्याने तिची बॅग उघडली. तेव्हा त्या बॅगेत अंडाकृती आकाराची कँप्सूल दिसली. ती कॅप्सूल चिकटपटीने गुंडाळली होती. चौकशीसाठी महिलेला एआययुच्या कार्यालयात नेले जात होते. कॅप्सूलला वास येत असल्याने तक्रारदार हे ते धुण्यासाठी जात होते. तेव्हा ती महिला कॅप्सूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती. कॅप्सूल सूटत नसल्याने महिलेने तक्रारदार याच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर ती कॅप्सूल घेऊन विमानतळावरील शौचालयाच्या दिशेने धावत गेली.
हा प्रकार एका सफाई कामगार महिलेच्या लक्षात आला. ती सफाई कामगार महिला तिच्या पाठोपाठ धावत होती. दोन सफाई कामगारांना धक्का मारून ती शौचालयात गेली. अंडाकृती कॅप्सूल तिने शौचालयात टाकून फ्लश चालू केला. त्याच दरम्यान एक सफाई कामगार महिला तिथे गेली. दोन महिला सफाई कामगारांनी तिला पकडून एआययुच्या कार्यालयात आणले. कॅप्सूल बाबत तिच्याकडे चौकशी केली. मात्र तिने कॅप्सूल ची माहिती दिली नाही. तिला कारवाईसाठी सहार पोलीस ठाण्यात आणले. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा नोंद केला.