मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सहार येथील जेडब्ल्यू मेरीयटमध्ये अल्पवयीन सावत्र मुलीला आणून तिच्यावर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तीन वर्षांनी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसांनी ४१ वर्षांच्या आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला अद्याप अटक झाली नसून चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान ही घटना जेडब्ल्यू मेरीयट हॉटेलमध्ये घडल्याने गुन्ह्यांचा तपास सहार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पिडीत तरुणी २० वर्षांची असून सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत चांदीवली परिसरात राहते. आरोपी तिचा सावत्र पिता असून तो त्यांच्यासोबत राहत होता. सतरा वर्षांची असताना डिसेंबर २०२१ रोजी त्याने तिला सहार येथील जेडब्ल्यू मेरीयट हॉटेलमध्ये आणले होते. तिथेच ते दोघेही एका रुममध्ये होते. याच रुममध्ये त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे जिवासह बदनामीच्या भीतीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला, तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. सावत्र पित्याकडून सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने तिच्या पित्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
बुधवारी ६ नोव्हेंबरला ती ओशिवरा पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पित्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दाखल घेत पिडीत तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पिडीत मुलीची जबानी नोेंदवून पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३५४ (ब), ३७६ (२), (एफ), ५०६ भादवी सहकलम ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता, त्यामुळे त्याचा तपास सहार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. आरोपी पित्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.