अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात अभिनेता सैफअली खान जखमी

चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या हल्लेखोराकडून एक कोटीची मागणी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – चोरीच्या उद्देशाने वांद्रे येथील सदगुरु शरण या पॉश अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन अज्ञात हल्लेखोराने सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सैफअली खानसह त्याची घरातील मोलकरीण असे दोघेही जखमी झाले असून या दोघांवर वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सैफअलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. हल्ल्यात सैफअलीचे दोन नर्स महिला जखमी झाले असून त्यांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. प्रचंड सुरक्षा असतानाही हल्लेखोर फ्लॅटमध्ये प्रवेश करतो आणि सैफअलीवर प्राणघातक हल्ला करतो या घटनेने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत पळून गेलेल्या हल्लेखोराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या दहा पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या हल्लेखोराने एका स्टाफ नर्सकडे एक कोटीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना गुरुवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास वांद्रे येथील थिरीसा स्कूलजवळील गँट रेसीडन्सी हॉटेलसमोरील जंक्शन २४ आणि २५ रोड, सदगुरु शरण या पॉश अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटमध्ये सैफ अली खान हा त्याची पत्नी करीना कपूर खान, त्याचे मुले राहतात. अकरा आणि बाराव्या मजल्यावर सैफ, करिना, दुसर्‍या रुममध्ये तैमुर राहत असून त्याची देखभाल गिता ही नर्स करते. एलियामा फिलीप ही तिथे स्टाफ नर्स म्हणून गेल्या चार वर्षांपासून कामाला आहे. तिच्यासह जुनू यांच्यावर जयबाबा याची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. रात्री दोन वाजता एलियामाला काहीतरी आवाज आला. बाथरुमचा दरवाजा आणि लाईट चालू असल्याने ती तिथे गेली होती. तिथे तिला एक अज्ञात व्यक्ती असल्याचे दिसून आले. तिने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तिला आरडाओरड करु नकोस अशी धमकी दिली. तो तिच्या अंगावर धावून येणार, इतक्याच ती जयबाबाला घेऊन बाहेर निघून गेली होती. यावेळी त्याने तिच्यावर ब्लेडले हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात तिच्या दोन्ही करंगळीजवळ, डाव्या हाताच्या बोटावर जखम झाली होती. तिने त्याला क्या चाहिए असे विचारताच त्याने तिला एक कोटी हवे असल्याचे सांगितले.

ही संधी साधून ती ओरडत फ्लॅटबाहेर आली. तिचा आवाज ऐकून सैफअली आणि करीना कपूर तिथे आले. यावेळी सैफने त्याला कोण आहे, काय हवे असे विचारताच त्याने त्याच्यावर ब्लेडने हल्ला केला होता. त्यात त्याची मोलकरीण गीता आली आणि तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सैफने स्वतची सुटका करुन ते सर्वजण फ्लॅटच्या बाहेर पडले. काही वेळानंतर इतर नोकरांना ही माहिती समजली होती. ते सर्वजण पुन्हा फ्लॅटच्या दिशेने गेले. मात्र तिथे तो हल्लेखोर नव्हता. या हल्ल्यात सैफअलीच्या मानेच्या पाठीवर, उजव्या खांद्यावर, हाताच्या मनगटावर आणि कोपरावर तर गीताच्या उजव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर आणि चेहर्‍यावर दुखापत झाली होती. त्यामुळे या सैफअलीसह इतर दोघींनाही वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे गिता आणि एलियामा यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करुन त्यांना सोडून देण्यात आले तर सैफअलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी सैफअलीसह त्याच्या कुटुंबियांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे.

या जबानीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ३११ (मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याचा प्रयत्नसहित जबरी चोरी किंवा दरोडा), ३१२ (प्राणघातक हत्यारनिधी सज्ज असताना जबरी चोरी किंवा दरोड्याचा प्रयत्न), ३११ (४) रात्रीच्या वेळेस घरफोडी), ३३१ (६) कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करण्याची किंवा दुखापतीची पूर्वतयारी करुन घरफोडी करणे), ३११ (७) जे कोणी गृह अतिक्रमण किंवा घरफोडी करताना कोणत्याही व्यक्तीला जबर दुखापत करणे, किंवा कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याचा किंवा जबर दुखापत करण्याचा प्रयत्न) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा सैफअलीच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे.

वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे दहाहून अधिक पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. इमारतीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन एका आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. सहाव्या मजल्यावरील सीसीटिव्हीमध्ये हा हल्लेखोर कैद झाला आहे. तो माहीमचा रहिवाशी असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध रॉबरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जाते. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असून त्याला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर सैफअलीच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता, यावेळी त्याने एक कोटीची मागणी केली होती. त्याचा चोरीचा प्रयत्न फसल्याने त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या सैफअलीवर ब्लेडने हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सैफअलीच्या इमारतीमध्ये कडेकोट बंदोबस्त असून तिथे दिवसा आणि रात्री सुरक्षारक्षक तैनात असतात. इमारतीमध्ये प्रवेश करताना त्यांची चौकशी केली जात होते. या चोरट्याने इमारतीच्या मागील बाजूची संरक्षक भिंतीवरुन आत प्रवेश केला होता. तिथे सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून त्याने सैफअलीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. याच प्रकरणात इमारतीच्या सुरक्षारक्षकासह सैफअलीच्या नोकराची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. सैफअली चोरट्यचा हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त समजताच बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्याच्या परिचित सिनेअभिनेता, अभिनेत्रीसह इतरांनी लिलावती हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन त्याची विचारपूस केली होती. या गुन्ह्यांत सैफअलीच्या नोकरांचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. घटनेनंतर गुरुवारी दुपारी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल. घरासह डकची तपासणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page