मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – त्या रात्री सुरुवातीपासून ते हल्लेखोर पळून जाण्यापर्यंतचा सविस्तर घटनाक्रम प्रसंग सिनेअभिनेता सैफअली खान याने वांद्रे पोलिसांच्या जबानीत कथन केला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सैफअलीची जबानी नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक त्याच्या राहत्या घरी गेले होते. यावेळी त्याची जबानी नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यांत त्याची जबानी महत्त्वाची मानली जाते. दरम्यान हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुन्हा वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी गुन्ह्यांतील बूट शोधण्यासाठी, बांगलादेशातून भारतात आणण्यासाठी त्याला कोणी मदत केली तसेच त्याच्या अटकेवरुन अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्याची चौकशी करणे बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत २९ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली.
वांद्रे येथील सैफअलीच्या राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने घुसलेला हा व्यक्तीने चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या चार दिवसांत म्हणजे १९ जानेवारीला शरीफुलला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत होता. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला शुक्रवारी दुपारी पुन्हा वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिल प्रसाद जोशी आणि किशोर पाटील यांनी वांद्रे पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासाची माहिती कोर्टात सांगितली. हल्लेखोराच्या फुटेजमध्ये दिसणारा आरोपी तीच व्यक्ती असल्याचे निश्चित करण्यासाठी आरोपीच्या चेहर्याची ओळख पटविणे आश्वयक आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती दुसरा असल्याचा दावा आरोपीच्या वडिलांनी केला होता. शरीफुलला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यातून त्याच्या अटकेवरुन अनेक प्रश्नचिन्हे निर्मा झाले होते. त्यामुळे गुन्ह्यांचे स्वरुप आणि तपासातील प्रगी पाहता त्याच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
सैफअलीच्या घरात सापडलेले पायाचे ठसे आणि आरोपीच्या पायाचे ठसे जुळणे आवश्यक आहे. हल्ल्याच्या वेळेस शफीकुलने घातलेले बूट अद्याप सापडले नाही. त्यामुळे या बूटाचा शोध घेणे बाकी आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगून त्याच्या बांगलादेशातील ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन शफीकुल हा बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले आहे. बिजय दास या नावाने त्याला बोगस आधारकार्ड आणि पॅन बनविण्यास कोणी मदत केली. त्यात काही आर्थिक व्यवहार झाला का याचा शोध घेणे बाकी असल्याचे सांगितले. दुसरीकडे शफीकुलचे वकिल दिनेश प्रजापती आणि संीप शेरकाहणे यांनी पोलिसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केला. त्यांनी या घटनेच्या विश्वासर्हतेवरच संशय व्यक्त केला आहे. तसेच त्याच्या पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली.
दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी के. सी राजूपत यांनी शफीकुलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान शरीफुलच्या अटकेवरुन अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याच्या चेहर्याचे लवकरच रेकग्नीझन केले जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.
सैफअलीचा जबाब वांद्रे पोलिसांनी नोंदविला
हल्ल्यात जखमी झाल्यानंतर डिस्चार्ज मिळताच घरी परत आलेल्या सिनेअभिनेता सैफअली खानची वांद्रे पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. त्या रात्री नेमके काय घडले, त्यांना हल्लेखोर घरात घुसला याची माहिती कशी मिळाली, त्यांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला का, त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर कसा पळून गेला याबाबत माहिती विचारण्यात आली होती. यावेळी सैफअलीने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्या रात्री तो त्याची पत्नी करीनासोबत बेडरुममध्ये होता. अचानक जहॉंगीरच्या नर्सचा आवाज आला आणि तो आवाजाच्या दिशेने धावून गेला. तिथे त्याला हल्लेखोर दिसला. त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यात त्याच्या पाठीला, मानेला, हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने मुलगा जहॉगीर आणि पत्नी करीनाला एका रुममध्ये बंद करुन घेतले होते. हल्लेखोराच्या मागावर त्याचे इतर नोकर गेले होते, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले.