दहा दिवसांच्या कोठडीनंतर शरीफुलची रवानगी कारागृहात
पोलीस कोठडीनंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – दहा दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर सिनेअभिनेता सैफअली खानवर हल्ला करणार्या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याची बुधवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शरीफुलला बुधवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या आणखीन दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती, मात्र कोर्टाने त्याची पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अभिनेता सैफअलीवर झालेल्या हल्ल्यानंतर पळून गेलेल्या शरीफुलला १९ जानेवारीला ठाण्यात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. तेव्हापासून तो दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला बुधवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर यांनी सरकारी वकिलांच्या मदतीने आरोपीच्या पोलीस कोठडीची आणखीन दोन दिवसांची मागणी केली होती. पोलिसांनी चाकूचा तुकडा, गमचा, हल्ल्याच्या दिवशी घातलेले कपडे ताब्यात घेतले आहे. तसेच चाकू घेतलेल्या घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे.
वांद्रे पोलिसांची एक टिम कोलकाता येथे तपासकामी गेले आहे. त्यांच्या तपशील येणे बाकी आहे त्यामुळे पोलीस कोठडीत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. मात्र न्या. कोमलसिंग राजपूत यांनी तपास आणि पुरावे गोळा करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असे सांगून शरीफुलला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले होते.
या गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यत तीनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यापैकी २५ सीसीटिव्ही फुटेजमध्ये शरीफुल हा स्पष्टपणे दिसत आहे. हल्ल्यापूर्वी त्याने दोन दिवसांपूर्वी घटनास्थळीची रेकी केली होती. त्याला बांगलादेशातून भारतात येण्यास तसेच भारतात आल्यानंतर मदत करणार्या आरोपीचा शोध सुरु आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध काही पुरावे सापडल्यास त्यासाठी वांद्रे पोलीस त्याची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी करु शकतात.