सैफअली हल्लाप्रकरणी हल्लेखोराचा पोलिसांना ढूंढते रहे जायोगे
तीन दिवस उलटूनही हल्लेखोर पोलिसांपासून दूरच
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांने मुंबई पोलिसांचा चांगलाच दम काढल्याचे चित्र दिसत आहे. तीन दिवस उलटूनही हल्लेखोर सापडत नसल्याने वरिष्ठांकडून संबंधित पोलिसांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही पोलीस अधिकारी मिडीयाशी बोलण्यास तयार नाही. हल्लेखोराने मुंबई पोलिसांना ढूंढते रहे जायोगे असे सांगून एक प्रकारे आव्हान दिल्याचे दिसून येते. दुसरीकडे संशयिताच्या चौकशीचे थातूरमातूर कारण पुढे करुन वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी आमचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचा दावा करत आहे. दरम्यान मुंबईहून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करणार्या आकाश कैलास कन्नोजिया या ३१ वर्षांच्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा ताबा लवकरच वांद्रे पोलिसांकडे सोपविला जाणार आहे. त्यानंतर आकाशची वांद्रे पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर या गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे की नाही याचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथील राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका हल्लेखोराने सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे वांद्रे पोलिसांनी हल्ल्याच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह झोनमधील निवडक अधिकारी आणि गुन्हे शाखेचे वीस ते पंचवीस विशेष पथकाकडून तपास सुरु आहे. हल्लेखोराच्या अटकेसाठी संबंधित पोलीस पथक मुंबईसह मुंबईबाहेर रवाना झाले आहेत. मात्र तीन दिवस उलटूनही पोलिसांना सैफअलीवर हल्ला करणारा हल्लेखोर सापडत नसल्याने वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. गुन्हा घडून तीन दिवस उलटूनही तुम्हाला आरोपी सापडत नसेल तर घरी बसा असा दमच या अधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्याचे बोलले जाते.
हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे येथे चार ते पाच होता. त्यानंतर तो दादर रेल्वे स्थानकात आला आणि तेथून मुंबईबाहेर पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याच दरम्यान काही संशयितांची पोलिसांनी चौकशी केली, मात्र या चौकशीतून त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला नाही. त्यामुळे चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांशी संबंधित एक संशयित व्यक्ती मुंबईहून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून पळून गेल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या आरोपीचा फोटोसह इतर माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर ज्ञानेश्वरी एक्सप्रेसची माहिती काढताना ही एक्सप्रेस गोंदिया आणि राजनांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी दुर्ग रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून तिथे आलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधील संशयिताचा शोध सुरु केला होता. यावेळी जनरल डब्बा क्रमांक १९९३१७/सी येथून प्रवास करणार्या एका संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याचे नाव आकाश कन्नोजिया असल्याचे उघडकीस आले. ही माहिती नंतर रेल्वे पोलिसांकडून वांद्रे पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी वांद्रे पोलिसांची एक टिम तिथे रवाना झाली आहे. ही टिम विमानाने रात्री आठ वाजता रायपूर येथे जाऊन तेथून आरोपीचा ताबा घेणार आहे. त्याला रात्री उशिरापर्यंत मुंबईत आणून त्याची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर त्याचा या गुन्ह्यांत सहभाग आहे की नाही याबाबत काही सांगता येईल असे एका अधिकार्याने सांगितले.