हुश्श….. अखेर बांगलादेशी हल्लेखोर ठाण्यात सापडला

हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कट होता का याचा तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जानेवारी २०२५
मुंबई, – चोरीचा उद्देशाने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर चाकूने हल्ला करणारा बांगलादेशी हल्लेखोर अखेर ठाण्यात सापडला. शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर असे या ३० वर्षीय हल्लेखोराचे नाव असून तो बांगलादेशच्या झलोकाठी, नॉलसिटीच्या राजाबरीयाचा रहिवाशी आहे. हल्ल्यानंतर वांद्रे, दादर आणि ठाण्याला गेल्यानंतर तो ठाण्याहून बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच त्याला ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट परिसरातून पोलिसांनी जेरबंद केले. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय पोलिसाकडून व्यक्त होत असून त्या दृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सिनेअभिनेता सैफअली खान हा वांद्रे येथील थिरीसा स्कूलजवील रेसीडन्सी हॉटेल, २४ व २५ वा रोडच्या सदगुरु शरण अपार्टमेंटच्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. १६ जानेवारी रात्री दोन वाजता त्याच्या फ्लॅटमध्ये चोरीचा उद्देशाने एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. मात्र महिला स्टाफमुळे त्याचा चोरीचा प्रयत्न फसला आणि त्याने सैफअलीवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफअली हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या हल्लेखोराचा शोध सुरु केला होता. त्यासाठी वांद्रे पोलिसांसह झोनमधील काही निवडक अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे शंभरहून अधिक पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाकडून हल्लेखोराची माहिती काढून त्याच्या अटकेसाठी काहींना मुंबई तर काहींना मुंबईबाहेर पाठविण्यात आले होते. मात्र आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानी प्रचंड नाराजी व्यक्त करुन या पथकाची चांगली कानउघाडणी केली होती.

अखेर शनिवारी या हल्लेखोराविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. तो ठाण्यात वास्तव्यास असून तेथून तो बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने शनिवारी रात्री ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट परिसरातील काही कामगाराची चौकशी केली होती.या कामगाराच्या चौकशीतून हल्लेखोर काहीच अंतरावर असलेल्या झुडपात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद शरीफुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सैफअली खानवर चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तो ठाण्यातून बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना थोडा तरी वेळ झाला असता तो तेथूनही निसटला असता असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. चेंबूर पोलीस ठाण्यात काही तास चौकशीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात नेण्यात आले. निळ्या रंगाचे शर्ट घातलेल्या आरोपीचा चेहरा झाकून कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी गिरगाव लोकल कोर्टाचे न्यायमूती् के. के पाटील यांच्यासमोर हजर केल्यानंतर पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी त्याच्या चौदा दिवसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा करुन पोलिसांनी तो सात वर्षांपूर्वी भारतात आला होता. त्याला सेलिब्रिटी राहतात त्या परिसराची माहिती होती का, त्याने सैफअलीवर चोरीच्या उद्देशाने हल्ला केला की या हल्ल्यामागे अन्य काही कारण होते, अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षकाचा कडेकोट पोलीस बंदोबस्त होता, तरीही तो चाकू घेऊन अपार्टमेंटमध्ये घुसला आणि बाराच्या मजल्यारील सैफअलीच्या फ्लॅटपर्यंत गेला होात. याकामी त्याला कोणी मदत केली का, या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कटाचा काही संबंध आहे का, पळून जाताना त्याने वाटेत कपडे बदलले होते, त्याने ते कपडे कुठे ठेवले होते, हल्ल्यानंतर त्याने चाकूचा तुकडा कुठे टाकला. तो बांगलादेशातून कशासाठी आला होता.

हल्ल्यासाठी त्याने चाकू कोठून आणला होता. पळून जाण्यास त्याला अन्य कोणी मदत केली का याचा सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीत चौदा दिवसांची मागणी सरकारी वकिलाकडून करण्यात आली होती. दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावत आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नसून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवावे अशी मागणी केली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. के. के. पाटील यांनी मोहम्मद शरीफुलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हॉटेलमध्ये चोरी केलेल्या चाकूने सैफवर हल्ला
३० वर्षांचा शफीफुल फकीर हा मूळचा बांगलादेशचा नागरिक असून नॉलसिटीच्या राजाबरीया परिसरात त्याचे संपूर्ण कुटुंबिय राहतात. बांगलादेशात प्रचंड गरीबी आणि उपासमारी आहे. त्यामुळे अनेक बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात प्रवेश करुन नोकरी करतात. भारतीय नागरिक असल्याचे दस्तावेज तयार करतात. बांगलादेशातील गरीबी आणि उपासमारीला शरीफुल हा प्रचंड कंटाळून गेला होता. जीवन जगणेही मुश्किल झाले होते. त्यातच त्याला कोणीतरी मुंबईत जाण्याचा सल्ला दिला होता. मुंबई कोणालाही उपाशी ठेवत नाही. तिथे काही ना काही काम मिळते. त्यामुळे त्याने भारतात पळून जाण्याचा निर्णय घेतला. सात वर्षांपूर्वी भारतात आल्यानंतर त्याने अंधेरी, विलेपार्ले, वरळी येथे लहानसहान काम केले होते. याच दरम्यान त्याला एका हॉटेलमध्ये काम लागले होते. या हॉटेलमधील कामगारांना एका कॉन्ट्रक्टरने ठेवले होते. मात्र त्याच्यासोबत कॉन्ट्रक्ट संपल्यानंतर या सर्वांना कामावर काढून टाकण्यात आले होते. यावेळी त्याने हॉटेलमधून एक चाकू चोरी केला होता. या चोरीच्या चाकूचा वापर त्याने सैफअलीवर हल्ला करण्यासाठी केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यापूर्वी त्याने याच चाकूच्या धाकावर ठाण्यात चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. ठाण्यातील चोरीचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर तो चोरीच्या उद्देशाने मुंबईत आला होता. वांद्रे परिसरात फेरफटका मारत होता. तो एका पॉश सोसायटीजवळ आला होता. तिथे उच्चभू लोक राहत असल्याने त्याने तिथेच चोरीचा निर्णय घेतला होता. चोरीच्या उद्देशाने तो सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये घुसला आणि सैफअलीच्या घरात घुसला होता. त्यावेळेस त्याला तो सैफअलीच्या फ्लॅटमध्ये आला आहे हे माहित नव्हते. हल्ल्यानंतर तो दादरला एका मित्राला भेटला होता. त्यानंतर तो ठाण्यात गेला होता. यावेळी त्याला सिनेअभिनेता सैफअली खान हा अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे समजले. त्याच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेला सैफअली असल्याचे त्याला याच बातमीतून समजले होते असे त्याने तपासात सांगितले.
सैफअली हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडून होणार
अभिनेता सैफअली खानवर झालेल्या हल्ल्याची गृहविभागाने गंभीर दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास लवकरच गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून योग्य दिशेने तपास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. आरोपीसह गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रे संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सैफअलीवर हल्ला करणारा मोहम्मद शफीफुल हा मूळचा बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले असून तो सात वर्षांपूर्वी भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आला होता. त्यानंतर त्याने स्वतचे नाव बिजोय दास असे ठेवले होते. अनेकांना तो मूळचा कोलकाताचा असल्याचे सांगत होता. त्याचे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही कागदपत्रे सापडले नाही. त्याने हॉटेलसह एका पबमध्ये काम केले होते. सैफअलीवर हल्ला केल्यानंतर तो वांद्रे आणि नंतर दादर येथे गेला होता. त्यानंतर त्याने स्वतचा मोबाईल बंद केला होता. अधूनमधून तो मोबाईल सुरु करत होता. याच दरम्यान त्याला त्याच्या हल्ल्यात जखमी झालेला अन्य कोणी नसून सिनेअभिनेता सैफअली खान असल्याचे समजले होते. या हल्ल्याबाबत दिवसभर विविध चॅनेल्सवर बातमी दाखविली जात होती. या सर्व बातम्या तो मोबाईलवर पाहत होता. पोलीस आपल्या मागावर असल्याचे त्याला माहीत होते. मात्र फिरताना तो खूपच काळजी घेत होता. सीसीटिव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणी तो स्वतचा चेहरा लपविण्याचा प्रयत्न करत होता. दादर येथे गेल्यानंतर त्याने एका मोबाईल दुकानातून एअरफोन खरेदी केला होता. अटकेच्या भीतीने तो सतत स्वतचे लोकेशन बदलत होता. या गुन्ह्यांतून आपली सुटका नाही हे समजल्यानंतर तो दादर येथून ठाण्याला गेला होता. रविवारी रात्री उशिरा तो ठाण्यातून बांगलादेशला पळून जाणार होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page