सैफअली खान हल्लाप्रकरणी पुरावा गोळा करण्यावर भर
सुरुवातीपासून पकडल्यानंतर घटनाक्रमाची माहिती घेतली जात आहे.
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर हल्ला करणार्या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याची वांद्रे पोलिसाकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून येणार्या माहितीवरुन पोलिसांनी जासतीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. झटापटीत शरीफुलने सैफअलीवर मागून हल्ला केल्याचे उघडकीस आले असून फ्लॅटमध्ये प्रवेश करताना तसेच पळून जाताना एकोणीस ठिकाणी त्याच्या हाताचे ठसे पोलिसांना प्राप्त ाले आहे. या गुन्ह्यांत हाताचे ठसे महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. हल्ल्यापूर्वी ते हल्ल्यानंतर पळून गेल्यानंतर पकडल्यानंतरचा सविस्तर घटनाक्रमाची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.
चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर सैफअलीवर चाकूने हल्ला करुन हल्लेखोर पळून गेला होता. अखेर चार दिवसांनी शरीफुलला ठाण्यातून मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून शरीफुलकडून पोलिसांकडून सुरुवातीपासून घटनाक्रमाची माहिती घेत आहेत. तो कोठून आणि कसा आला. वांद्रे येथे तो कधी आला होता. चोरीसाठी त्याने रात्रीची वेळ का निवडली. सैफअलीच्या घरी चोरी करताना त्याला तिथे सैफअली खान हा राहत होता याची आधीच माहिती होती का याचा तपशील काढण्याचा प्रयत्न करत आहे. चोरीनंतर तो कुठे आणि कसा गेला. या कालावधीत तो कोणाच्या संपर्कात आला होता. या कटाची इतर कोणालाही माहिती होती. शेवटचा कॉल त्याने पांडे नावाच्या मित्राला केला होता. याच मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर शरीफुलचा ठावठिकाणा पोलिसांना सापडला होता. तो हिरानंदानीजवळ एका खाडीजवळ लपला असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, पोलीस शिपाई कैलास सावकारे, आश्विन कोळेकर आणि अन्य एका पोलीस शिपायाने अंधारात त्याचा शोध सुरु केला होता.
मोबाईलचे टॉच लावून या पथकाने रात्री उशिरा झुडपात लपलेल्या शरीफुलला ताब्यात घेतले. त्याला नंतर वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. चौकशीत सुरुवातीपासून ते अटकेपासून सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. या घटनाक्रमानंतर पोलिसांनी आता त्याच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला होता. त्याने ज्या प्रकारे हल्ला केला, त्यावरुन तो पूर्वनियोजित तयारी करुनच आल्याचे दिसून आले आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, मुंबईसह देशभरात तो ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास होता, तिथे त्याने काही गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध बांगलादेशात काही गुन्हे दाखल आहेत का याचाही पोलीस तपास करत आहेत. त्याने हल्ल्यानंतर कपडे कुठे लपविले, हल्ल्यापूर्वी त्याने इमारतीची रेकी केली होती याचाही पोलीस तपास करत आहेत. ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस सदगुरु शरण या अपार्टमेंटची सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळेस दोन सुरक्षारक्षक कर्तव्यावर हजर होते. त्यापैकी एक सुरक्षारक्षक केबीनमध्ये होता तर दुसरा मागील बाजूस नव्हता. हीच संधी साधून शरीफुल हा मागून पाईपवरुन इमारतीवर चढला होता. बाराव्या मजल्यावर गेल्यानंतर त्याने तिथे चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न सैफअलीच्या महिला स्टाफमुळे फसला गेला.
याच दरम्यान तिथे सेैफअलीला आला आणि त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. स्वतची सुटका करण्यासाठी त्याने सैफअलीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर तो काही मजले खाली उतरुन आला आणि नंतर पुन्हा पाईपवरुन खाली उतरुन पळून गेला होता. हल्ल्याच्या वेळेस एका व्यक्तीने पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. सैफअलीवर हल्ला करणारा शरीफुल हा क्रिडापटू असून त्याने बांगलादेशात जिल्हा पातळीवरील क्रिडा स्पर्धेत भाग घेतल्याचे बोलले जाते. अटकेच्या वेळेस त्याने तो बांगलादेशचा नागरिक असल्याची कबुली देताना तेथून त्याच्या नातेवाईकाला कॉल केला होता. त्यांनी त्याच्या मोबाईलवर काही कागदपत्रे पाठविले होते. या कागदपत्रावरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.
दोनशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा गौरव
सैफअलीवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांकडून काही विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने चार दिवस अहोरात्र मेहनत करुन आरोपीविषयी माहिती काढून, तो कोणाच्या संपर्कात होता. त्याचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त होते. त्याचे लास्ट लोकेशन काढून त्याला अखेर ठाण्यातील हिरानंदानी येथून अटक केली. संबंधित दोनशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचार्यांचा सोमवारी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सत्कार केला होता. या सर्वांचे कौतुक करताना त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
शरीफुलच्या मोबाईलवरुन अनेक खुलासे होणार
शरीफुलचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. या मोबाईलवरुन अनेक खुलासे होणार आहे. त्यात पोलिसांना काही स्क्रिनशॉट सापडले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये कोणाकोणाचे क्रमांक आहे. त्याने ते क्रमांक कोणाच्या नावाने सेव्ह केले आहे. हल्ल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात आला होता. त्याने मोबाईलवर इंटरनेटचा वापर केला होता, या इंटरनेटवरुन त्याने काय पाहिले, सैफअली खानवर झालेल्या हल्ल्याची माहिती त्याला मोबाईलवरुन समजली होती असे सुरुवातीला बोलले जात होते. त्यात किती तथ्य आहे याचाही तपास सुरु आहे. शरीफुलने ई-वॉलेटचा वापर केला होता त्याचे कुठल्या बँकेत अकाऊंट आहे. त्याने कुठल्या बँकेचे लिंक केले आहे. त्याने कुठल्या नावाने बँकेत खाते उघडले आहे आदी माहिती काढली जात आहे. त्याच्या ई-वॉलेटवरुन कधी आणि कुठले व्यवहार झाले होते. त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो सापडले आहे. हल्ल्यापूर्वी त्याने काही फोटो काढल्याचे उघडकीस आले आहे. बांगलादेशातून भारतात आल्यानंतर त्याने कोणाच्या नावाने मोबाईल आणि सिमकार्ड घेतला. बांगलादेशातील नातेवाईकासह मित्रांच्या तो नियमित संपर्कात होता. त्यासाठी तो कुठल्या ऍप्सचा वापर करत होता. या ऍपवरुन तो कधी आणि कोणाच्या संपर्कात होता याची माहिती घेतली जात आहे.
शरीफुलमुळे काहीना विनाकारण मनस्ताप
सैफअली खानवरील हल्ल्यानंतर हल्लेखोरासारख्या दिसणार्या काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच कसून चौकशी केली होती. मात्र चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यात ग्रॅटरोड येथे राहणारा शाहिद शेख आणि कुलाबा येथील आकाश कनोजिया यांचा समावेश होता. ते दोघेही शरीफुलसारखे दिसत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शाहिदला ताब्यात घेताना तो घरात टिव्ही पाहत होता. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली होती. चौकशीत त्याचा या हल्ल्यात काहीच संबंध नसल्याचे उघडकीस आले आणि नंतर त्याला सोडून देण्यात ाअले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करणार्या आकाश कनोजियाला ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीत त्याचाही सहभाग उघडकीस आला नव्हता. त्यामुळे त्यालाही सोडून देण्यात आले. शरीफुलमुळे या दोघांना प्रचंड मनस्ताप झाला होता.