त्या दिवसाचा संपूर्ण सीन वांद्रे पोलिसांकडून रिक्रिएट

ओळख पटविण्यासाठी फेशियन आयडी प्रणालीचा वापर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर हल्यानंतर ते पकडले जाईपर्यंत या कटाचा मुख्य आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याने काय काय केले यासाठी वांद्रे पोलिसांकडून मंगळवारी पहाटे त्या दिवसाचा संपूर्ण सीन रिक्रिएट करण्यात आला आहे. वांद्रे येथे आल्यानंतर सैफअलीच्या फ्लॅटमध्ये घुसून हल्ल्यानंतर तो वांद्रे, वरळी आणि दादर येथे गेला आणि तो ठाण्याला पळून गेला होता. ठाण्यातूनच तो बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता अशी घडलेली सविस्तर माहिती सांगितली. सीन रिक्रिएटच्या माध्यमातून वांद्रे पोलिसांनी जास्तीत माहिती काढून त्याच्याविरुद्ध पुरावा गोळा करण्यावर भर दिला होता. त्यामुळे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे त्याची ओळख पटविण्यासाठी मुंबई पोलिसांनी फेशियल आयडी प्रणालीचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वांद्रे येथे राहणार्‍या सिनेअभिनेता सैफअली खान याच्या फ्लॅटमध्ये शरीफुल हा चोरीच्या उद्देशाने घुसला होता, मात्र चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने सैफअलीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. हल्ल्यानंतर त्याचा मुंबई पोलिसांकडून शोध घेतला जात होता. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अखेर चार दिवसांनी शरीफुलला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्याने सुरुवातीपासून ते अटकेपर्यंतचा सविस्तर घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. हल्ल्यानंतर तो कुठे गेला, त्याने काय केले याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

मंगळवारी वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने शरीफुलसोबत त्या दिवसाचा संपूर्ण सीन रिक्रिएट केला होता. त्याला पहाटे वांद्रे येथे आणून तो सैफअलीच्या घरी कसा केला, हल्ल्यानंतर तो कुठे गेला या सर्व ठिकाणी त्याला नेण्यात आले होते. सुरुवातीला त्याला वांद्रे येथील एका नामांकित कॉलेज परिसरात आणण्यात आले होते. त्यानंतर तो सैफअलीच्या घरी गेला आणि तेथून वांद्रे, वरळी आणि दादर परिसरात गेला होता. हल्ल्यानंतर तो सर्वप्रथम बॅण्डस्टॅण्डला गेल्याचे सांगितले. तेथून तो वरळी आणि नंतर दादर येथे आला होता. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू त्याने एका हॉटेलमधून चोरी केला होता. हा चाकू तो त्याच्या बॅगेत नेहमी ठेवत होता. हल्ल्याच्या वेळेस त्याने टोपी घातली होती, मात्र हल्ल्यानंतर त्याने ती टोपी बॅगेत ठेवली होती. या टोपीसह शरीफुलचे कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. ती टोपी आणि कपडे गुन्ह्यांतील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
शरीफुलच्या संपर्कात असलेल्या एजंटचा शोध सुरु
बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्यानंतर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर हा काही महिने कोलकाता येथे वास्तव्यास होता. बांगलादेशातील उपासमारीसह गरीबीला कंटाळून तो भारतात नोकरीसाठी आला होता. त्यासाठी तो नोकरीच्या शोधात होता. मात्र त्याला कोलकाता येथे नोकरी मिळाली नाही. नोकरीच्या प्रयत्नात असताना तो एका एजंटच्या संपर्कात आला होता. त्याच्याशी मैत्री करुन त्याने एक मोबाईल विकत घेतला होता. त्यासाठी त्याला त्या एजंटने सिमकार्ड घेण्यास मदत केली होती. मार्च महिन्यांत त्याने सिमकार्ड ऍक्टिव्ह केला होता. याच मोबाईलवरुन तो बांगलादेशातील कुटुंबातील सदस्यासह नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात होता. कोलकाता येथे असताना त्याला त्या एजंटने मदत केली होती. त्यामुळे हा एजंट आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक कोलकाता येथे जाणार आहे. काही महिन्यानंतर तो मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता. याच दरम्यान त्याने मुंबईत हॉटेल, पबमध्ये काम केले होते. मात्र सैफअलीच्या हल्ल्यानंतर तो प्रचंड घाबरला होता. भारतात राहिलो तर आपले काही खरे नाही याची त्याला जाणीव झाली होती. त्यामुळे त्याने पुन्हा बांगलादेशात पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने त्या एजंटला संपर्क साधून त्याला बांगलादेशात पाठविण्याची विनंती केली होती. मात्र त्याने त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी केली होती. त्यांच्यातील आर्थिक व्यवहार फसल्याने त्याचे काम झाले नव्हते. त्यामुळे तो भारतात ज्या मार्गाने आला होता, त्या मार्गाने पुन्हा बांगलादेशात जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशात जाण्यासाठी त्याला मोठा हात मारायचा होता, जेणेकरुन त्याला जास्त पैसे मिळतील अशी आशा होता, मात्र त्याचा हा प्रयत्नही फसला होता. बांगलादेशला पळून जाण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती सापडला.
सैफअली हल्ल्याचा तपास अधिकारी बदलला
सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावरील हल्ल्याचा तपास पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकडवाड यांच्याकडे होता. मात्र आता हा तपास पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तपास अधिकारी बदल्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. सैफअलीच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा तपास पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडे सोपविला होता. सुरुवातीला तेच या गुन्ह्याचंा तपास करत होता. शरीफुलला अटक केल्यानंतर त्याची चौकशी आणि जबानी नोंदविण्याचे काम सुरु होते. मात्र मंगळवारी या गुन्ह्यांचा तपास अचानक सुदर्शन गायकवाड यांच्याकडून काढून पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे या गुन्ह्यांचा अजय लिंगनूरकर यांच्याकडे असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page