पत्नीसह मुलावर हल्ला करुन लातूरला पळालेल्या पतीला अटक
वाढदिवसाचा केक उशिराने आणला म्हणून केला होता हल्ला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जून २०२४
मुंबई, – पत्नीसह मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करुन लातूरला पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. राजेंद्र धोडींबा शिंदे असे या आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने शुक्रवार ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाढदिवसाचा केक उशिराने आणला म्हणून त्याने त्याची पत्नी रंजना आणि मुलगा सुनिल यांच्यावर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर तो लातूरला पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
रंजना ही तिचा पती आणि मुलासोबत साकिनाका परिसरात राहते. ती घरकाम करते तर तिचा मुलगा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी राजेंद्रचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने रंजनाला रात्री कामावरुन येताना केक आणण्यास सांगितले होते. शनिवारी ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली तर तिचा मुलगा बाहेर गेला होता. रात्री या दोघांनाही घरी येण्यास उशीर झाला होता. मात्र त्यांनी आठवणीने केक आणला होता. वाढदिवसाचा केक उशिराने आणला म्हणून राजेंद्रला प्रचंड राग आला होता. याच कारणावरुन त्याने रंजनाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनिलने मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजेंद्रला आणखीन राग आला आणि त्याने घरातील चाकूने या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर तो घरातून पळून गेला. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मायलेकाला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे रंजनावर प्राथमिक औषधोपचार करुन सोडून देण्यात आले तर सुनिलची दुखापत गंभीर असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राजावाडी हॉस्पिटलमधून ही माहिती नंतर साकिनाका पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी रंजनाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर राजेंद्र हा पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना तो लातूरला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.