मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – साकिनाका परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या २६ वर्षांच्या तरुणाला ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४७ किलो गांजा, एक कार आणि मोबाईल असा ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर राज्यातून गांजा मुंबईत आणून त्याची विक्री करण्याची आरोपीची योजना होती, मात्र गांजासह अटकेची कारवाई झाल्याचा त्याची ही योजना फसली गेली आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी सायंकाळी वांद्रे युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी साकिनाका परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांनी एका कारमधून जाणार्या आकाश नावाच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना ४७ किलो गांजा सापडला. या गांजासह कार आणि मोबाईल ताब्यात घेऊन त्याला युनिटच्या कार्यालयात आणण्यात आले होते. चौकशीत त्याने तो गांजा इतर राज्यातून मुंबई शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गुरुवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन केराम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर व अन्य पोलीस पथकाने केली.