साकिनाका येथे वयोवृद्धाच्या घरी घरफोडीने खळबळ
सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दागिने पळवून नेले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जानेवारी २०२५
मुंबई, – पत्नीसोबत कर्नाटकच्या गावी गेलेल्या एका वयोवृद्धाच्या घरात प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने सुमारे दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे. रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना २२ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत साकिनाका पाईपलाईन, मोहिली व्हिलेजच्या कुर्द महालमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या सी/सहामध्ये दिनेश देवन्ना राय हे ७० वर्षांचे वयोवृद्ध त्यांची पत्नी सुनितासोबत राहतात. ते वरळीच्या आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये कामाला होते. आठ वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. २२ डिसेंबरला ते त्यांच्या पत्नीसोबत कर्नाटकच्या मंगलोर, उडपी गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीच नव्हते. ही संधी साधून काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. लोखंडी कपाटातील तिजोरीतून १० लाख २९ हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. रविवारी २९ डिसेंबरला सकाळी आठ वाजता ते त्यांच्या गावाहून घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले.
अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन कपाटातील सर्व सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी साकिनाका पोलिसांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळीचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी दिनेश राय यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.