मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – मुंबईसह संपूर्ण राज्यात पाणी कपातीचे सावट असताना साकिनाका येथे आंघोळीच्या पाण्यावरुन पती-पत्नीमध्ये प्रचंड शाब्दिक बाचाबाची आणि रागाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मीरा परमात्मा गुप्ता ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला साकिनाका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमात्मा राजबली गुप्ता असे या आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईसह राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच पाणी पुरवठा करणार्या धरणामध्ये पाणी साठा कमी झाल्याने सर्वत्र पाणी कपात करण्यात आले आहे. त्याचाच फटका एका महिलेला बसला आहे. मीरा ही महिला तिचा पती परमात्मासोबत साकिनाका येथील टिळकनगर परिसरात असून घरकाम करते. शनिवारी दुपारी तिचा पती कामावरुन घरी आला होता. घामामुळे त्याला आंघोळ करायच होती, मात्र पाणी कपातीमुळे घरात पाणी नाही. त्यामुळे आंघोळ करु नका असे तिने त्याला सांगितले. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. प्रकरण विकोपास गेले आणि रागाच्या भरात परमात्माने मिरावर घरातील चाकूने वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. जखमी झालेल्या मीराला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मीराची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी तिचा पती परमात्मा गुप्ता याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला साकिनाका येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.