बहिणीला घटस्फोट दिला म्हणून भावोजीवर प्राणघातक हल्ला
साकिनाका येथील घटना; आरोपी मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – नोकरीवरुन होणार्या वादातून बहिणीला घटस्फोट दिला म्हणून रागाच्या एका तरुणाने त्याच्याच भावोजीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात फिरोज लालमोहम्मद सिद्धीकी (३१) हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी फिरोजचा मेहुणा इस्माईल सुल्तान शेख ऊर्फ सुफियान याच्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. हल्ल्यानंतर इस्माईल पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता साकिनाका येथील जरीमरी, खानखा दर्गाजवळील फलक मोबाईल शॉपी दुकानात घडली. फिरोज सिद्धीकी हा मूळचा झारखंडचा रहिवाशी असून सध्या साकिनाका परिसरात राहतो. याच परिसरात त्याचा फलक नावाचे एक मोबाईल शॉप आहे. सप्टेंबर २०२१ रोजी त्याचे हिना नावाच्या एका २७ वर्षांच्या तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर तो साकिनाका परिसरात भाडेतत्त्वावर राहत होता. तिला लग्नानंतर नोकरी करायची होती, मात्र तिच्या नोकरीला त्याचा विरोध होता. याच कारणावरुन त्यांच्यात सतत भांडणे होत होती. नेहमी होणार्या भांडणाला कंटाळून या दोघांनी जानेवारी २०२२ रोजी संमतीने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर हिना ही तिच्या आई-वडिलांसोबत राहण्यासाठी निघून गेली होती. घटस्फोटानंतर त्यांची कधीच भेट किंवा संभाषण झाले नव्हते. तरीही त्याचा मेहुणा इस्माईल हा त्याला सतत कॉल करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता तो दुकान बंद करत होता.
याच दरम्यान तिथे इस्माईल आला आणि त्याने काही कळण्यापूर्वीच त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात फिरोज हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या फौजिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. फिरोजची जबानी नोंदवून पोलिसांनी त्याचा मेहुणा इस्माईल शेखविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर इस्माईल हा पळून गेला असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.