होमवर्क केला नाही म्हणून नऊ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण

खाजगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – होमवर्क केला नाही म्हणून एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला त्याच्याच खाजगी क्लासच्या शिक्षकाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. या मुलाला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षक शैलेश व्यकप्पा शेट्टी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

यातील तक्रारदाराचा कपड्याचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जरीमरी, भारतील चाळीत राहतात. त्यांना एक नऊ वर्षांचा मुलगा असून तो साकिनाका येथील एका खाजगी शाळेत दुसरीत शिकतो. याच परिसरात गिता मॅडम यांचे एक खाजगी ट्यूशन असून तिथेच त्यांचा मुलगा खाजगी शिकवणीसाठी जात होता. शैलेश शेट्टी हा तिथे लहान मुलाचे शिकवणी घेतो. सायंकाळी पाच ते सात या कालावधीत त्यांचा मुलगा क्लासला जात होता. मंगळवारी २१ जानेवारीला ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर निघून गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करुन क्लासमधील शिक्षक शैलेश शेट्टी यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली असून त्याच्या हातातून रक्त येत आहे. त्याच्या पाठीवर गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. त्यामुळे ते कामावर घरी आले होते. त्यांनी त्यांच्या मुलाकडे चौकशी केली असता त्याने तो सायंकाळी नेहमीप्रमाणे क्लाससाठी निघून गेला होता.

काही वेळानंतर तो रडत घरी आला होता. त्याने त्याचा होमवर्क पूर्ण केला नव्हता. त्यामुळे त्याला शैलेश शेट्टीने लाकडी काठीने बेदम मारहाण केली होती. हातासह पाठीवर आणि पायाला मारहाण केल्याने त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते क्लासमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी शैलेशकडे विचारणा केल होती. यावेळी त्याने होमवर्क पूर्ण न केल्याने त्याला मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी त्यांना लहान मुलांना इतक्या क्रुरपणे मारहाण करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला याबाबत जाब विचारला होता. त्यावेळी त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. आरोपी शिक्षकाने त्यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर ते त्यांच्या मुलाला घेऊन राजावाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर त्यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खाजगी क्लासचा शिक्षक शैलेश शेट्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी शिक्षकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page