स्क्रॅपमधील तांबे खरेदी-विक्री व्यवहार करुन व्यापार्याची फसवणुक
86 लाखांच्या पेमेंटच्या अपहारप्रकरणी ब्रोकरला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई,- स्क्रॅपमधील तांबे खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका व्यापार्याकडील सुमारे 86 लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन पळून गेलेल्या ब्रोकरला चार महिन्यानंतर साकिनाका पोलिसांनी अटक केली. युसूफ इस्माईल बवानी असे या 39 वर्षीय ब्रोकरचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या भावनगर, इब्राहिम मशिद रोड, शिशु विहारच्या खुशबू पार्कचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
नरेश पूनमचंद जैन हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत ताडदेव परिसरात राहतात. त्यांचा तांबे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायात युसूफ बवानी हा ब्रोकर म्हणून कामाला होता. ते दोघेही एकाच व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांची चांगली ओळख होती. नरेश जैन हे युसूफला गेल्या चार वर्षांपासून ओळखत असून त्याच्यामार्फत त्यांनी मुंबई शहरातील अनेक व्यापार्यांकडून तांबे खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. या व्यवहाराचे त्याने पेमेंट वेळेवर दिल्याने त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. फेब्रुवारी 2025 रोजी तो त्यांच्या कार्यायात आला होता. त्याने त्याच्याकडे स्क्रॅपमधील दहा टन तांबे असल्याचे असून या मालाचा आपण सौदा केल्यास चांगला फायदा होईल असे सांगितले होते.
सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात 775 प्रति किलो तांबे खरेदी करण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी साकिनाका येथे माल घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करुन त्यांचा कर्मचारी चौथाराम भाखारामजी बिष्णोईला पाठविले होते. तिथे दहा टन माल भरल्यानंतर त्याने त्यांना व्हॉटअपवर फोटो पाठविला होता. या मालाची 83 लाख 86 हजार रुपये इतकी किंमत होती. त्यामुळे त्यांनी युसूफला घाटकोपर येथील एका अंगाडिया कार्यालयातून पैसे घेण्यास सांगितले होते. तसेच हा माल महेंद्र जैन यांच्या साकिनाका येथील दुकानात जमा करण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे युसूफ हा घाटकोपर येथे गेला आणि त्याने संबंधित अंगाडिया कार्यालयातून 83 लाख 86 हजार रुपयांचे पेमेंट घेतले होते. त्यानंतर तो तेथून निघून गेला होता.
याबाबत नरेश जैन यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी युसूफने 50 लाखांचे पेमेंट आणले असून उर्वरित तीस लाख रुपये आणून देतो असे सांगून निघून गेल्याचे सांगितले, मात्र बराच वेळ होऊन तो परत आला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. स्क्रॅपमधील तांबे खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन युसूफने त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच नरेश जैन यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर युसूफ बवानीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या युसूफचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या युसूफला गुजरात येथून साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून अपहार केलेली रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.