वाहतूक शिपायाशी हुज्जत घालणार्‍या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

दंडात्मक कारवाईला विरोध करुन ई-चलन तोडून दिले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – साकिनाका वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या चंद्रकांत शिवाजी राठोड यांच्याशी हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ करुन एका व्यावसायिकाने दंडात्मक कारवाईला विरोध करताना ई-चलन तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करताना सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लालाजी नाथालालजी देवडा याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत त्याला अटक झाली असून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आली आहे. चौकशीनंतर त्याच्यावर कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले.

ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास साकिनाका येथील अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, साकिनाका मेट्रो स्टेशनजवळील पेनिन्सुला हॉटेल जंक्शनजवळ घडला. बदलापूरचे रहिवाशी असलेले चंद्रकांत राठोड हे सध्या साकिनाका वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. रविवारी ते दिवसपाळीवर हजर झाले होते. त्यानंतर ते सकाळी साडेनऊ वाजता ते साकिनाका मेट्रो स्टेशनजवळील पेनिन्सुला हॉटेल जंक्शन परिसरात कर्तव्य बजावत होते.

यावेळी लालाजी देवडा हा त्याच्या कारमधून तेथून जात होता. त्याला चंद्रकांत राठोड यांनी थांबवून त्यांच्याकडून वाहन चालविण्याचा परवाना, विमा आणि पीयुसीच्या कागदपत्रांची मागणी केली होती. यावेळी त्यांच्या कारच्या विमा आणि पीयुसी संपल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे चंद्रकांत राठोड यांनी त्यांच्याकडील ई-चलन मशिनद्वारे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यावेळी लालाजीने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन त्यांना अपमानास्पद वागणुक दिली. त्यांना धमकावून त्यांच्या शर्टाला खेचून त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.

इतकेच नव्हे त्यांच्या हातातील ई-चलन मशिन घेऊन ते मेट्रोच्या खांब्यावर फेंकून, तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले होते. या घटनेनंतर माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी चंद्रकांत राठोड यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लालाजी देवडा याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. लालाजी देवडा हा व्यावसायिक असून तो पवईतील मिलिटरी रोड, अशोक टॉवरमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page