भरस्त्यात पोर्न व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जानेवारी 2026
मुंबई, – भरस्त्यात हात पकडून पोर्न व्हिडीओ दाखवून एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध साकिनाका पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
15 वर्षांची बळीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत साकिनाका परिसरात राहते. 12 जानेवारी ती नेहमीप्रमाणे तिच्या क्लासला गेली होती. क्लास संपल्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजता ती तिच्या घरी जाण्यासाठी पायी जात होती. याच दरम्यान तिथे एक अज्ञात व्यक्ती आला होता. भरस्त्यात त्याने तिचा हात पकडून त्याच्या मोबाईलवर पोर्न व्हिडीओ दाखवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे ती तेथून पळून घरी निघून आली.
भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मंगळवारी तिने हा प्रकार साकिनाका पोलिसांना सांगून संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत या व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. 12 जानेवारीला सायंकाळी पावणेसहा वाजता ही घटना घडली होती, त्यामुळे त्या दिवसांतील परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. लवकरच संबंधित आरोपीला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान भरस्त्यात एका अल्पवयीन मुलीला पोर्न व्हिडीओ दाखवून तिच्याशी लगट झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.