मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने घटस्फोटीत प्रेयसीवर लैगिंक अत्याचार करुन ती गरोदर असल्याचे समजताच प्रियकराने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन साकिनाका पोलिसांनी आरोपी प्रियकर पकंज इनरमन यादव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
२२ वर्षांची महिला ही मानखुर्द येथे राहते. चार वर्षांपूर्वी तिचे एका तरुणासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत खार येथे राहत होती. नंतर ती गोवंडीतील शिवाजीनगर, बैंगनवाडीत राहण्यासाठी आली होती. तिथेच तिची ओळख २३ वर्षीय पंकजशी झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. यावेळी पंकज तिला सतत ती त्याला आवडत असल्याचे सांगत होता. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. लग्नाचे आमिष दाखवून तो तिला घाटकोपर येथील एका लॉजमध्ये घेऊन आला होता. तिथेच त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले होते. ही माहिती नंतर तिच्या पतीला समजताच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्याने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रकार तिने पंकजला सांगितला होता. यावेळी त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मार्च २०२३ रोजी त्यांच्यात संमतीने घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती तिच्या आईकडे राहायला गेली होती. काही दिवसांनी ती पंकजसोबत चेंबूर येथील एका भाड्याच्या रुममध्ये राहू लागले. तिथे सहा महिने राहिल्यानंतर ते दोघेही स्वतंत्र राहू लागले. मात्र ते दोघेही नियमित घाटकोपर येथील लॉजमध्ये भेटत होते. तिथेच त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले होते. त्यातून ती गरोदर राहिली होती. यावेळी तिने पंकजला लग्नाविषयी विचारणा सुरु केली होती,
मात्र तो तिला लग्नाचा विषय निघताच टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तो तिला टाळण्याचा प्रयत्न करु लागला. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या घरातून कुठेतरी निघून गेला होता. याबाबत त्याने कोणाला काहीही सांगितले नाही. पंकजने लग्नाचे आमिष दाखवून केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केल्याचे लक्षात येताच तिने साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पिडीत महिला सध्या आठ महिन्यांची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले.