मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दबंग सिनेअभिनेता सलमान खान याच्या राशीला बिष्णोई टोळीच्या नावाचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. सतत येणार्या धमक्यांमुळे खान कुटुंबिय तणावात असताना त्यात आणखीन एका धमकीची भर पडली आहे. सोमवारी रात्री उशिरा वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमला बिष्णोई नावाने सलमान खानला आणखीन एका धमकीचा मॅसेज प्राप्त झाला असून त्यात अज्ञात व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचे सांगून कालविट शिकारप्रकरणी सलमान खानने बिष्णोाई मंदिरात जाऊन माफी मागावी नाहीतर बिष्णेाई टोळीला पाच कोटी रुपयांची खंडणी द्यावी. ही रक्कम दिली नाहीतर त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत कर्नाटक येथून विक्रम नावाच्या एका संशयिताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा घेण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टिम कर्नाटकला रवाना झाली आहे.
काळविट शिकारीनंतर सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर होता. गेल्या काही महिन्यांपासून या टोळीकडून सलमान खानला सतत जिवे मारण्याची धमकी येत होती. इतकेच नव्हे तर त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ बिष्णोई टोळीने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर मुख्य शूटरसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची बिष्णोई टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर धमकीची मालिका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानला एका अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुतारकाम करणार्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून त्याने ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांचा आमदार पूत्र झिशान सिद्धीकी आणि सलमान खान या दोघांना पुन्हा धमकी आली होती. या धमकीनंतर वरळी आणि वांद्रे पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन दोन्ही आरोपींना अटक केली होती.
या धमकीच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर सोमवारी साडेबारा वाजता वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुंमच्या हेल्पलाईन क्रमांकावर सलमानच्या नावाने आणखीन एक धमकीचा मॅसेज आला होता. या मॅसेजमध्ये अज्ञात व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असल्याचा दावा केला होता. तुला जिवंत राहायचे असेल तर आमच्या बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. नाहीतर तुला आम्हाला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी अद्याप ऍक्टिव्ह आहे असा मजकूर मॅसेजमध्ये देण्यात आला होता. या धमकीनंतर ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरळी पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तपासाला सुरुवात केली होती.
तपासादरम्यान हा मॅसेज कर्नाटक येथून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ही माहिती कर्नाटक पोलिसांना देण्यात आली. या पथकाने विक्रम नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या मोबाईलवरुन हा मॅसेज वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमला पाठविण्यात आला होता. त्यामुळे ही माहिती नंतर मुंबई पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर मुंबई पोलिसाची एक टिम रोडमार्गे कर्नाटकला रवाना झाले आहेत. या संशयिताला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानला सतत खंडणीसह जिवे मारण्याच्या धमक्या येत असून यातील बहुतांश गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तरीही धमकीचे सत्र सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.