गोळीबारानंतर सलमानने लावली घराच्या बाल्कणीला बुलेटप्रुफ काच
सतत येणार्या धमकीनंतर गॅलेक्सीबाहेर आता पोलीस चौकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेला गोळीबार आणि सतत येणारे धमक्याचे कॉल आदी घटनेनंतर दबंग अभिनेता सलमान खान याने त्याच्या राहत्या घरातील बाल्कणीला बुलेटप्रुफ काच लावली आहे. इतकेच नव्हे तर या काचेसह भिंतीवर काटेरी तारेचे कुंपन लावण्यात आले आहे. दरम्यान सलमान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर असल्याने त्याच्या गॅलेक्सी घराजवळ वांद्रे पोलिसांची एक बीट चौकी उभारण्यात आली असून तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
१४ एप्रिलला दोन बाईकस्वारांनी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पाच ते सहा गोळ्या फायर केल्या होत्या. गोळीबारानंतर ते दोघेही पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोन्ही शूटरला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी भूज येथून अटक केली होती. या गोळीबारानंतर सलमानसह त्याच्या कुटुंबियांना सतत जिवे मारण्याच्या धमकी येत होती. त्यात काही अज्ञात व्यक्तींनी बिष्णोई टोळीच्या नावाने त्याच्याकडे खंडणीची मागणी केली होती. गोळीबारानतर सतत येणार्या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेत सलमानला विशेष सुरक्षा पुरविण्यात आली होती. सलमानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती.
याच दरम्यान सलमानचे अत्यंत जवळचे मित्र आणि कौटुंबिक संबंधित असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथे बिष्णोई टोळीकडून हत्या झाली होती. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर खान कुटुंबियांनी गंभीर दखल घेत गॅलेक्सी इमारतीमधील सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून सलमानने त्याच्या घराच्या बाल्कणीला बुलेटप्रुफ काच लावली आहे. या बुलेटप्रुफ काचेसह भिंतीवर काटेरी तारेच कुंपन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर वांद्रे पोलिसांनी तिथे एक बीट चौकी तयार करण्यात आली आहे. तिथे २४ तास पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहे. सलमानच्या घरी आता बुलेटप्रुफ बाल्कणी, आधुनियक सुरक्षा यंत्रणा आणि जवळपास कोणतीही संशयास्पद गतीविरोधी शोधण्यासाठी उच्च रिझोल्शूशन सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहे.