मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खानला पुन्हा खंडणीसाठी धमकीचा मॅसेज वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या हेल्पलाईन क्रमांकावर आला आहे. अज्ञात व्यक्तीने बिष्णोई टोळीच्या नावाने सलमानकडे पाच कोटीची खंडणीची मागणी केली असून खंडणीची रक्कम दिली नाहीतर तुझा गेम करु अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सलमानला धमकी आल्याची ही चालू महिन्यांत सातवी घटना असून या धमकीमागे कोणीतरी खोडपणा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरीही या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला बिष्णोई टोळीच्या नावाने सतत खंडणीसाठी धमकी येत आहे. बिष्णोई टोळीशी सुरु असलेला वाद मिटविण्यासाठी यापूर्वीही त्याच्याकडे खंडणीची धमकी देण्यात आली होती. गेल्या पाच ते सहा वेळा सलमानसह आमदार झिशान सिद्धीकी याला अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी धमकी दिली होती. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करुन धमकी देणार्या संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. तरीही खंडणीसाठी येणार्या धमक्याचे मॅसेजचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर सलमानच्या नावाने आणखीन एक मॅसेज पाठविण्यात आला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने तो बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करुन सलमानकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्याचा गेम करु अशी धमकी दिली होती. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशांनतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे.
वाहतूक पोलिसांचे कंट्रोल रुममध्ये खंडणीसाठी फेव्हरेट
गेल्या काही दिवसांत सलमानला आलेले खंडणीचे सर्व कॉल वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या हेल्पलाईन क्रमांकावर आले आहे. आतापर्यंत पाच अज्ञात व्यक्तीने या हेल्पलाईन क्रमांकावर खंडणीसाठी मॅसेज करुन पोलिसांच्या माध्मयातून सलमानकडे खंडणीची मागणी केली होती. सलमान थेट धमकी न देता संंबंधित व्यक्तीचा खंडणीसाठी वाहतूक पोलिसांचा हेल्पलाईन क्रमांक फेव्हरेट असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शाहरुख खानला अज्ञात व्यक्तीने ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. ही धमकी अज्ञात व्यक्तीने थेट वांद्रे पोलीस ठाण्याच्या लँडलाईन क्रमाकांवर दिला होता. धमकी देणारे खंडणीखोर पोलिसांच्या माध्यमातून सलमान, शाहरुखला धमकी देत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा हेल्पलाईक क्रमांक पोलिसांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे.