मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जुलै २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या फायरिंगप्रकरणी मोक्का कायद्यांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाचही आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेने सोमवारी १७०० पानांचे आरोपपत्र मोक्का कोर्टात सादर केले आहे. या आरोपींमध्ये मोहम्मद रफिक चौधरी, विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई आणि हरपाल सिंग यांचा समावेश आहे. आरोपपत्रात चाळीसजणांची साक्ष नोंदविण्यात आली असून त्यात सलमान खान, त्याचा भाऊ अरबाज खान यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस कोठडी असताना एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे उर्वरित पाचही आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ १४ एप्रिलला दोन बाईकस्वारांनी फायरिंग केले होते. फायरिंगनंतर दोन्ही आरोपी बाईकवरुन पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुरतच्या भूज आणि पंजाब येथून चार आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याचा समावेश होता. सोनूकुमारने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या चौघांच्या अटकेनंतर राजस्थान येथून मोहम्मद रफिक चौधरी तर हरियाणा येथून हरपाल सिंग अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यत आला होता. याच गुन्ह्यांत त्यांना पुन्हा अटक करुन त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून संपूर्ण कटाची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात आले होते. त्यापूर्वी पोलिसांनी गुन्ह्यांतील पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि रिकाम्या पुंगळ्या हस्तगत केल्या होत्या. गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने सोमवारी पाचही आरोपीविरुद्ध मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. १७०० पानांच्या या आरोपपत्रात ४० जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या आरोपपत्रात कटातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई आणि त्यांचा सहकारी रोहित गोदरा अशा तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.