मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दबंग अभिनेता सलमान खान याला येणार्या धमकीचे सत्र सुरुच असून त्यात आता आणखीन एका धमकीची भर पडली आहे. दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला जिवे मारण्याचा धमकीचा एक मॅसेज वाहतूक पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच आजम मोहम्मद मुस्तफा नावाच्या एका आरोपीस वरळी पोलिसांनी अटक केली. टाईमपास म्हणून त्याने धमकीचा मॅसेज पाठविल्याचे बोलले जाते.
अभिनेता सलमान खान हा गेल्या काही महिन्यांपासून बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. त्याला यापूर्वीही अनेकदा पत्रासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिष्णोाई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर प्रत्येक वेळेस सलमानच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. मे महिन्यांत सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नसला तरी केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार झाला होता. याच गुन्ह्यांचा काही तासांत पोलिसांनी पर्दाफाश करुन गोळीबार करणार्या शूटरसह इतर आरोपींना अटक केली होती. आता या धमकीमध्ये आणखीन एका धमकीची भर पडली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचा एक व्हॉटअप क्रमांक आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता या क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने सलमानच्या नावाने काही मॅसेज पाठविले होते. त्यात त्याने सलमानकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नंतर वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांना देण्यात आली होती.
वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोतीराम दळवी यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वरळी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संमातर तपास सुरु केला होता. मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरवरुन तो मॅसेज वांद्रे येथून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने वांद्रे येथून आजम मोहम्मद मुस्तफा याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही धमकी दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. आजम हा वांद्रे येथे राहत असून गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता त्याने टाईमपास म्हणून हा मॅसेज पाठविला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे वाहतूक पोलिसांच्या व्हॉटअप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने सलमान खान याच्या नावाने एक धमकीचा मॅसेज पाठविला होता. त्यात सलमानला जिवंत राहायचे असेल, बिष्णोई टोळीशी सुरु असलेला वाद कायमचा मिटवायचा असेल तर बिष्णोई टोळीला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. नाहीतर त्याची अवस्था बाबा सिद्धीकीपेक्षा वाईट करु अशी धमकीच मॅसेजद्वारे देण्यात आली आहे. या धमकीनंतर वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून झारखंड येथून एका भाजी विक्रेत्या आरोपीस अटक केली. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतरच्या बातम्या पाहून त्याने सलमानला धमकी दिल्याची कबुली दिली होती. या धमकीनंतर त्याने पोलिसांची माफी मागितली होती. मात्र त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. या धमकीला काही दिवस उलटत नाही तोवर आता पुन्हा सलमानला दोन कोटीच्या खंडणीसाठी धमकी आली होती. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली.