शस्त्रे पुरविणार्‍या दोन्ही आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

सलमान खान घराजवळील फायरिंगप्रकरण

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या फायरिंगसाठी शूटरला शस्त्रे पुरविणार्‍या दोन्ही आरोपींना रात्री उशिरा पंजाबहून मुंबईत आणले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोघांनाही शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवार ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पंजाबच्या फाजिलका, अबोहर, सुखचैन गावचे रहिवाशी आहेत. ते दोघेही बिष्णोई बंधूंच्या संपर्कात असून त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी गोळीबारासाठी विकीकुमार गुप्ता आणि सागरकुमार पाल यांना शस्त्रे पुरविल्याची कबुली दिली आहे. याकामासाठी त्यांना ३५ हजार रुपये मिळाले होते अशी माहिती तपासात उघडकीस आले आहे. चारही आरोपींची समोरासमोर चौकशी होणार असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१४ एप्रिलला सलमन हा राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता. बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने पाच ते सहा गोळ्या फायर करुन पलायन केले होते. या गोळीबारानंतर अवघ्या दोन दिवसांत मुंबईहून सुरतला पळून गेलेल्या विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर राऊत पाल यांना भूज येथून पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहे. चौकशीत त्यांना फायरिंगसाठी सोनूकुमार आणि अनुजकुमार यांनी शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याच चौकशीतून ते दोघेही पंजाबचे रहिवाशी असून शस्त्रे दिल्यानंतर ते दोघेही पुन्हा पंजाब येथे गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे गुन्हे शाखेची एक टिम पंजाबला पाठविण्यात आली होती. या दोघांचा शोध सुरु असतानाच त्यांना गुरुवारी पंजाबच्या संगरुर, भवानी गड येथून पोलिसांनी अटक केली. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर रात्री उशिरा या दोघांनाही पंजाबहून विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने त्यांच्या दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात ते दोघेही पंजाबचे रहिवाशी असून त्यांनी दोन्ही शूटरला दोन पिस्तूल, चार मॅगझीन आणि चाळीसहून अधिक जिवंत काडतुसे दिल्याची कबुली दिली. ते दोघेही मोबाईलवरुन बिष्णोई बंधूंच्या संपर्कात होते. त्यांच्या गावापासून काही अंतरावर बिष्णोई बंधूंचे गाव आहे. त्यात गावात प्रचंड गरीबीसह बेरोजगार असल्याने ते दोघेही शस्त्रे देण्यासाठी तयार झाले होते. त्यासाठी त्यांना ३५ हजार रुपये देण्यात आले होते. त्यातील काही रक्कम त्यांनी नशा करण्यासाठी वापरली तर उर्वरित रक्कम आपसांत वाटून घेतली होती. यातील सोनू हा किराणा दुकानात तर अनुज हा क्लिनर म्हणून काम करतो. अनुज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मार्च महिन्यांत ते दोघेही पनवेल येथे आले होते. विकीकुमार आणि सागरकुमारला शस्त्रे दिल्यानंतर ते दोघेही पंजाबला निघून गेले होते. या दोघांनाही ते शस्त्रे कोणी दिली. त्यांनी कोणाच्या आदेशावरुन त्यांना शस्त्रांची डिलीव्हरी केली होती. ते शस्त्रे घेऊन ते पंजाबहून पनवेल येथे आले होते. तिथे विकीकुमार आणि सागरकुमार हे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. शस्त्रे दिल्यानंतर ते दोघेही पंजाबला निघून गेले होते. त्यामुळे गोळीबाराचा कट पंजाबमध्ये शिजला होता याचा पोलीस तपास करत आहे. त्यांचे मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात इतर कोणी सहकारी आहेत का. त्यांना शस्त्रांसाठी कोणी पैसे दिले होते, ते सलमान वगळता इतर कोणावर गोळीबार करणार होते याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page